रयतेच्या प्रश्नांसाठी अहोरात्र कष्ट केल्यानेच ‘जाणता राजा’ म्हणून आजही छत्रपति शिवाजी महाराजांचा लौकिक आहे. त्यांच्याच नावाचा जप करणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्तारूढ शिवसेना-भाजपने शिवरायांसारखा कारभार करायला सोडचिठ्ठीच दिली असून दीड कोटी रुपये खर्चून शिवरायांचा पुतळा उभारायला मात्र तात्काळ संमती दिली आहे. विकासकामांकडे गेल्या दोन वर्षांत सपशेल दुर्लक्ष करून त्यांना जणू निर्थक मानणाऱ्या सेना-भाजपची पुतळ्यासाठीची धडपड ‘अर्थपूर्ण’ भासत आहे.
कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळ शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय अखेर कल्याण-डोंबिवली महापालिकेने घेतला आहे. या कामासाठी सुमारे दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विद्युत रोषणाईसाठी सुमारे ८० ते ९० लाखांचा खर्च करण्यात येणार आहे. गेल्या दोन वर्षांत विकासकामांच्या आघाडीवर फारशी चमक दाखविण्यात अपयश आलेल्या सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारून काहीतरी करून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक काळात दिलेली विकासकामांची आश्वासने गेल्या अडीच वर्षांत युतीच्या नगरसेवकांना पूर्ण करता आलेली नाहीत. वैजयंती गुजर यांना महापौर म्हणून या काळात फारसे ठोस असे काही करून दाखविता आलेले नाही. त्यामुळे महापौरपदावरून पायउतार होता होता काहीतरी ‘करून दाखविण्यासाठी’ शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणीचा घाट शिवसेनेच्या नेत्यांनी घातला आहे, अशी चर्चा आता शहरातील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. २० मार्च रोजी उद्धव ठाकरे या पुतळ्याच्या कार्यक्रमासाठी कल्याणमध्ये येत आहेत. निवडणूक काळात उद्धव ठाकरे यांनी शहरात मत्सालय, तारांगण उभे करून दाखवितो, असे आश्वासन कल्याण-डोंबिवलीकरांना दिले होते. पु.भा.भावे सभागृहाचे नूतनीकरणाचे आश्वासनही देण्यात आले होते. रश्मी ठाकरे यांनी भावे सभागृहाचे नूतनीकरण व्हावे म्हणून आग्रह धरला होता. या सर्व आश्वासनांना महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी फारसे गांभीर्याने घेतल्याचे चित्र सध्यातरी नाही. ठाकरे यांनी दिलेल्या महत्त्वाच्या आश्वासनांपैकी अजूनही येथील नागरिकांच्या पदरात फार काही पडलेले नाही.
महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे विकासकामांसाठी पैसा कोठून उभा करायचा, असा प्रश्न आहे. मोजक्याच नगरसेवकांच्या प्रभागात विकासकामे होतात. मात्र शहराच्या सार्वागीण विकासासाठी फार काही होत नाही, अशी एकंदर परिस्थिती आहे. या पाश्र्वभूमीवर शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय घेऊन सत्ताधाऱ्यांनी नेमके काय साधले, असा सवाल उपस्थि होत आहे. तीन टन वजनाचा बारा फूट उंच व चौदा फूट लांबीचा हा पुतळा ब्राँझचा आहे. नैसर्गिक दगडांवर त्याची उभारणी करण्यात येणार आहे. दुर्गाडी किल्ल्याजवळील दुर्गामाता चौकात हा पुतळा उभा करण्यात येणार आहे. ऐतिहासिक कल्याणमध्ये महाराजांचे दर्शन घेऊन नागरिक शहरात प्रवेश करतील अशी रचना करण्यात आली आहे, अशी माहिती सभागृह नेते रवींद्र पाटील यांनी दिली. शिल्पकार विजय शिरगावकर यांनी अश्वारूढ पुतळ्याचे शिल्प उभारले आहे. या कामासाठी ५० लाख खर्च आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा