आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेने जिल्ह्य़ाच्या उत्तर भागात म्हणजेच शिर्डी लोकसभा मतदारसंघात संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल केले आहेत. संगमनेर शहरासाठी उत्तर व दक्षिण अशी शहर प्रमुखांची दोन पदे तयार केली आहेत. श्रीरामपूरचे तालुकाप्रमुख राजेंद्र देवकर यांना बदलण्यात आले असून त्यांच्या जागी देवीदास सोनवणे यांची नेमणूक केली आहे. पदाधिकाऱ्यांची निवड करताना खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या समर्थकांना झुकते माप देण्यात आले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर जिल्ह्य़ात प्रथमच संघटनेत मोठे बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे नगर लोकसभा मतदारसंघात म्हणजेच दक्षिणेत मात्र कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांना कायम ठेवण्यात आले आहे. पण संपर्कनेते सुहास सामंत यांनी यापूर्वी नेमलेल्या पदाधिकाऱ्यांना डच्चू देण्यात आला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार कमी मताने पडले तेथे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी संपर्कनेत्यांच्या नेमणुका केल्या होत्या. श्रीरामपूरसाठी राजेश सपकाळ, राहात्यासाठी कोकीळ, तर अकोल्यासाठी मुंडे यांची नेमणूक केली होती. त्यांनी गाजावाजा न करता अनेकदा दौरे केले. त्यानंतर पदाधिकारी बदल करण्यात आला. सपकाळ यांचे श्रीरामपूर तालुकाप्रमुख देवकर यांच्याशी जमत नव्हते. सपकाळ यांच्याशी देवकर यांच्या समर्थकांचे वाद झाले होते. प्रकरण लोटालोटीपर्यंत गेले होते. सपकाळ यांच्याबद्दल देवकर यांनी कार्याध्यक्ष ठाकरे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. सपकाळ हटाव मोहीमही त्यांनी घेतली होती. पण सपकाळ हे प्रभावी ठरले. देवकर यांच्या विरोधातील शिवसैनिकांची पदाधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे.
राहाता विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून राजेंद्र पिपाडा यांनी निवडणूक लढविली होती. ते राष्ट्रवादीत गेले. त्यामुळे आता शेखर बोऱ्हाडे यांना उमेदवारी देण्याचा घाट घालण्यात आला असून त्यांची उपजिल्हाप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली. अकोले येथे मधुकर तळपाडे यांची उपजिल्हाप्रमुख, तर संगमनेरचे बाबासाहेब कुटे यांची तालुकाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे दोघांनाही विधानसभेची पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपजिल्हाप्रमुखपदी कोपरगावचे कैलास जाधव, श्रीरामपूरचे डॉ. महेश क्षीरसागर, संगमनेरचे दिलीप साळगट, राहुरीचे भागवत मुंगसे, नेवाशाचे रामदास गोल्हार व अकोल्याचे तळपाडे यांची नेमणूक झाली आहे. तालुका प्रमुख पुढीलप्रमाणे आहेत. राहाता- कमलाकर कोते, कोपरगाव- शिवाजी ठाकरे, श्रीरामपूर- देवीदास सोनवणे, संगमनेर- बाबासाहेब कुटे, अकोले- मच्िंछद्र धुमाळ, राहुरी- सर्जेराव घाडगे, नेवासे-बाबासाहेब पवार. शहरप्रमुख पुढीलप्रमाणे आहेत. शिर्डी- सचिन कोते, राहाता- गणेश सोमवंशी, कोपरगाव- काका शेखो, श्रीरामपूर-सचिन बडदे, अकोले- बबन धुमाळ, देवळाली प्रवरा- बाबासाहेब मुसमाडे, राहुरी- डॉ. संजय म्हसे, संगमनेर (उत्तर)- अमर कातोरे, संगमनेर (दक्षिण)- संजय फंड.
हे सर्व पदाधिकारी नेमताना खासदार वाकचौरे, आमदार अशोक काळे यांना विश्वासात घेण्यात आले. निष्ठावान शिवसैनिकांनाही न्याय देण्यात आला. श्रीरामपूरचे देवकर व खासदार वाकचौरे यांच्यात मतभेद होते. विधानसभेतील पराभूत उमेदवार भाऊसाहेब डोळस यांनीही देवकर यांच्याबद्दल आक्षेप नोंदवलेला होता. त्यामुळे देवकर यांना डावलण्यात आले. नव्याने नेमणूक झालेल्या पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत जाऊन कार्याध्यक्ष ठाकरे यांची भेट घेतली.

Story img Loader