शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी छावणीला नव्हे तर दावणीला चारा द्या, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेने तहसील कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढला. मोर्चात शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
जिल्ह्य़ात दुष्काळाची तीव्रता जास्त असून गेवराई तालुक्यात दुष्काळाच्या झळा अधिक जाणवत असल्याने जनावरांसाठी छावण्यांऐवजी दावणीला चारा द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला.
टंचाईग्रस्त गावांमध्ये मागेल त्याला पाण्याचे टँकर द्यावे, मजुरांच्या हाताला कामे द्यावे, भारनियमन रद्द करावे, कापूसउत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ३० हजार रुपये अनुदान द्यावे, वीजबिल माफ करावे, शैक्षणिक शुल्क माफ करावे, जयभवानी साखर कारखान्याचे वीज प्रकल्प उभारणीसाठी घेतलेले दहा हजार शेअर व्याजासहीत परत करावे आदी मागण्या करण्यात आल्या. शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, लक्ष्मण वडले, संजय महाद्वारे, अजय दाभाडे यांच्यासह शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा