० मातोश्रीच्या नाराजीनंतर भाजपची माघार
० विनोद तावडेंनी केली मध्यस्थी
० मित्रपक्षांमधील सुंदोपसुंदी पुन्हा चव्हाटय़ावर
 नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील बहुचíचत पोटनिवडणुकीत उमेदवार उभा करून शिवसेनेला कात्रजचा घाट दाखविण्याचे बेत आखणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांचे मनसुबे शिवसेनेने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे मंगळवारी धुळीस मिळाले. पालकमंत्री गणेश नाईक यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकावून शिवसेनेत परतलेले महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल मोरे यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची मानली जात आहे. मोरे यांना धूळ चारण्यासाठी नाईक यांनीही पडद्यामागून जोरदार हालचाली चालविल्या आहेत. त्यामुळे वाशीतील राजकीय वर्तुळात या निवडणुकीला सध्या कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. असे असताना मोरे यांच्याविरोधात उमेदवार उभा करून शिवसेनेला अपशकुन करण्याच्या तयारीत असणाऱ्या भाजपच्या काही स्थानिक पुढाऱ्यांवर थेट ‘मातोश्री’वरून डोळे वटारले गेल्याने हे बंड तूर्तास शमले असले तरी भाजपच्या या तिरक्या चालीमुळे शिवसेनेत कमालीची अस्वस्थता व्यक्त होऊ लागली आहे.
नवी मुंबईत भाजपची अगदीच तोळामासा अवस्था असतानाही मागील विधानसभा निवडणुकीत बेलापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेने सुरेश हावरे यांच्यासाठी भाजपच्या पारडय़ात टाकला. हावरे आणि मातोश्रीचे असलेले सलोख्याचे संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळे बेलापूर विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिकांचा आग्रह मोडून हा मतदारसंघ भाजपला बहाल करण्यात आला. गणेश नाईक यांच्यासारख्या तगडय़ा उमेदवाराला हावरे यांनीही जोरदार लढत दिली, मात्र त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचा अवघा एक नगरसेवक निवडून आला. त्यामुळे नवी मुंबईत भाजपची संघटनात्मक ताकद फारशी नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. विधानसभा आणि महापालिका निवडणुकीनंतरही वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून सतत चर्चेत राहिलेले सुरेश हावरे गेल्या काही काळापासून मात्र भूमिगत झाल्याचे चित्र येथील राजकीय वर्तुळात आहे. नाईक यांच्याशी घेतलेला राजकीय पंगा हावरे यांना फारसा मानवलेला नाही, अशी चर्चा नवी मुंबईच नव्हे तर ठाणे जिल्ह्य़ातील राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे भाजपचे ठाणे विभाग अध्यक्ष असणारे हावरे ठाणे तसेच कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतही फारसे कुणाच्या नजरेस पडले नाहीत तेव्हा कुणालाही आश्चर्य वाटले नव्हते. या पाश्र्वभूमीवर वाशीत येत्या ८ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेविरोधात उमेदवार उभा करण्याची तयारी करून भाजपने आपल्याच पायावर धोंडा मारून घेतल्याची चर्चा आता रंगली आहे.
शिवसेना नेते नाराज
गेल्या काही महिन्यांपासून पालकमंत्री गणेश नाईक आणि भाजपच्या काही स्थानिक नेत्यांमध्ये पुन्हा सुसंवादाचे वारे वाहू लागल्याचे बोलले जाते. वाशी सेक्टर सहा ते आठ या प्रभागात राहणारे भाजपचे काही ज्येष्ठ पदाधिकारी बऱ्याच काळापासून नाईकांच्या पालखीचे भोई म्हणूनच ओळखले जातात. त्यामुळे नाईक यांच्याविरोधात दंड थोपटणाऱ्या शिवसेनेविरोधात उमेदवार उभा करून अपशकुन करण्याचे बेत भाजपमधील या तथाकथित ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांकडून आखले जात होते. ही रणनीती लक्षात येताच शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ िशदे यांच्या माध्यमातून थेट मातोश्रीवर तक्रारी केल्या. पोटनिवडणुकीत उघड दगा झाल्यास बेलापूर मतदारसंघात त्याचे परिणाम सोसावे लागतील, असा इशाराही शिवसेना नेत्यांनी दिला होता. याची दखल घेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते विनोद तावडे यांच्याशी संपर्क करून शिवसेनेविरोधातील हे बंड थोपविल्याची चर्चा आता रंगली आहे. त्यामुळे सोमवारी रात्री उशिरापर्यंत शिवसेनेविरोधात उमेदवार उभा करण्याच्या हालचाली करणारे भाजप नेते मंगळवारी दुपापर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी फिरकले नाहीत. मातोश्रीवरून डोळे वटारले गेल्याने वरवर भाजपचे बंड थोपविले गेले असले, तरी प्रत्यक्ष पोटनिवडणुकीत कमळाबाई वाघाला कितपत साथ देईल, याविषयी मात्र शिवसेनेच्या गोटात संशयाचे वातावरण आहे.

यासंबंधी भाजपच्या नवी मुंबई जिल्हा अध्यक्षा वर्षां भोसले यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी शिवसेनेने सुरुवातीला उमेदवार जाहीर केला नसल्याने आमचा उमेदवार उभा करण्यासंबंधी चाचपणी सुरू केली होती, अशी माहिती दिली. शिवसेनेने या प्रभागात कोणाला उमेदवारी द्यायची यासंबंधी कोणतीही चर्चा केली नव्हती. त्यामुळे साहजिकच आमच्या पक्षाचा उमेदवार उभा करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. ही भाजपची तिरकी चाल नसून मातोश्रीवरून डोळे वटारण्याचा प्रकारही नाही, असा दावाही भोसले यांनी केला. सुरेश हावरे भाजपमध्ये सक्रिय असून ते राजकीय घडामोडींमध्ये मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे त्यांनी राजकीय संन्यास घेतल्याच्या वावडय़ा त्यांचे विरोधक उठवत आहेत, असा दावाही भोसले यांनी केला.