गणेशोत्सवात अनेक मंडळांनी शहर आहे तसेच आहे असे टिकात्मक देखावे सादर केले अशी खंत व्यक्त करत आमदार अनिल राठोड यांनी शिवसेना सत्तेवर आल्यानंतर शहरात अनेक विकासकामे झाली, असा दावा केला. शहरविकासात नागरिकांचा सहभागही आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
राठोड यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या जुन्या सभागृहात आज मनपा आयोजित गणेशोत्सव देखावा स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले. महापौर शीला शिंदे, उपमहापौर गीतांजली काळे, स्थायी समिती सभापती बाबासाहेब वाकळे, महिला बाल कल्याण समिती सभापती किरण उनवणे, उपसभापती मालनताई ढोणे, शिक्षण मंडळ सभापती सतीश धाडगे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
उत्सवकाळात जिल्हा प्रशासन शांतता समितीची बैठक घेत असते. या बैठकांना मंडळांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनाही बोलावले जावे, अशी सूचना राठोड यांनी केली. पारशा खुंट येथील शिवाजी आखाडा या मंडळाच्या जाणता राजा या देखाव्याला त्यांनी शिवसेनेच्या वतीने ५ हजार रूपयांचे पारितोषिक दिले व मनपाने पारितोषिकांच्या संख्येत वाढ करावी अशी सूचना केली.
महापौर श्रीमती शिंदे यांनी पुढील वर्षीपासून उपनगरांसाठी विशेष पुरस्काराचे आयोजन करण्याची घोषणा केली. उपमहापौर श्रीमती काळे यांनी देखाव्यांमध्ये सामाजिक जागृती करणारे अनेक देखावे होते हे चांगले असल्याचे मत व्यक्त केले. सभापती वाकळे व अन्य वक्तयांची भाषणे झाली. परिक्षकांच्या वतीने मकरंद खेर यांनी मनोगत व्यक्त केले. रविंद्र सातपुते, अनिल शाह, अण्णासाहेब नवथर, सुनिल हारदे, हरजीभाई दिवाणी, मुरलीधर नजान, सतीश शिंगटे यांचा सत्कार करण्यात आला. अमोल बागूल यांनी सूत्रसंचालन केले. सहायक आयुक्त संजीव परशरामी यांनी आभार मानले.