उद्या औरंगाबादेत मेळावा
मराठवाडय़ातील दुष्काळाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनू लागली आहे. गावोगावी पाणीसाठे आटत चालले आहेत. विंधनविहिरी कोरडय़ा पडू लागल्या आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावत आहे. दुष्काळग्रस्त भागातील जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडता यावी, या साठी शिवसेनेने दुष्काळाच्या आधारे संघटनात्मक बांधणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची जालना येथे सभा होणार असून त्याच्या तयारीसाठी म्हणून मराठवाडय़ातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा बुधवारी (दि. १६) संत तुकाराम नाटय़गृहात होणार आहे. विश्वनाथ नेरूरकर, खासदार अनिल देसाई या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेची मराठवाडय़ातील संघटनात्मक वीण काहीशी उसवल्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. खासदार सुभाष वानखेडे यांनी संपर्कप्रमुखांवर आरोप केले होते. औरंगाबादमध्ये सेनेचे दोन गट असल्याचे चित्र वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने समोर आले आहे. शिवसेनेचे बहुतांश खासदार दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांवर बोलताना त्यांच्यात एकवाक्यता नसते. या पाश्र्वभूमीवर दुष्काळग्रस्तांच्या समस्यांना एकत्रित करण्याच्या उद्देशाने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मराठवाडास्तरीय मेळावा दि. १६ जानेवारीला संत तुकाराम नाटय़गृहात आयोजिण्यात आला आहे. कार्याध्यक्ष ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी तयारीचा भाग म्हणून शिवसेनेचे नेते औरंगाबादला येणार आहेत. दुष्काळावर काय भूमिका घ्यायची याचा अभ्यासवर्ग होण्याची शक्यता आहे. मराठवाडय़ातून शिवसेनेला नेहमीच चांगला पाठिंबा असतो. तथापि, मुंबईतील शिवसेनेचे नेते मराठवाडय़ातील प्रश्नांकडे फारसे सजगपणे पाहत नाहीत. तुलनेने शिवसेनेचे नेते दिवाकर रावते विदर्भातील प्रश्न आक्रमकपणे मांडतात. कापूस व विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर त्यांनी घेतलेल्या जाणीवजागृतीच्या उपक्रमांचे संघटनात्मक पातळीवर कौतुकही होते. मात्र, मराठवाडा म्हणून शिवसेनेचे उपक्रम तसे खुजेच दिसतात. त्यामुळे मराठवाडय़ाच्या मेळाव्यात नक्की कोणत्या प्रकारची चर्चा होते, यावर शिवसेनेची आक्रमकता दिसून येणार आहे. जालन्यात अर्जुन खोतकर यांनीही जोर लावला असून, कार्याध्यक्ष ठाकरे यांची मराठवाडय़ातील सभा मोठी व्हावी, यासाठी शिवसेना सक्रिय झाली आहे.  

Story img Loader