जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दक्षिण मुंबई विभाग क्रमांक ८ महिला आघाडीतर्फे १० ते ७० वयोगटांतील तब्बल १०,५०० गरीब गरजू महिलांचा विमा काढण्यात येणार आहे. येत्या ८ मार्च रोजी विमा योजनेच्या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे.
युनायटेड इंश्युरन्स कंपनी लिमि. आणि ओरियंन्टल इन्शुरन्स कंपनी लिमि.च्या जीवन विमा आणि अपघाती विमा योजनेअंतर्गत दक्षिण मुंबईतील १०,५०० गरजू मुली आणि महिलांचा विमा काढण्यात येणार आहे. ‘श्री राजराजेश्वरी महिला विमा योजने’चा त्यांना लाभ घेता येईल. एखादी घटना अथवा अपघातात जखमी झालेल्या महिलेस अथवा मृत झालेल्या महिलेच्या वारसाला या योजनेनुसार ३०,००० रुपये भरपाई मिळणार आहे. शिवसेनेने केलेल्या आवाहनानुसार दक्षिण मुंबईमधील १०,५०० महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले होते. गिल्डर टँक मैदान, अप्सरा सिनेमागृहासमोर, ८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास रश्मी ठाकरे आणि खासदार अनिल देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात महिलांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा