महापालिका निवडणुकीत सपाटून हार पत्करल्यानंतर शिवसेनेतील गटबाजी दूर होईल, असे अपेक्षित होते. परंतु गुरुवारी विरोधी पक्षनेते पदाचा पदभार घेताना सेनेतील गटबाजी चव्हाटय़ावर आली. १४ पैकी ९ नगरसेवकांनी बहिष्काराचे हत्यार उपसल्यानंतर ‘मनधरणी’ नाटय़ाचा प्रयोग झाला.
जिल्ह्य़ात शिवसेनेअंतर्गत मोठी गटबाजी आहे. वेगवेगळ्या निवडणुकांत दारुण पराभव झाल्यानंतर पक्षात मरगळ आली असली, तरी त्यापासून धडा घेण्याची वा आत्मपरीक्षणाची तयारी कोणीही दाखवली नाही. उलट गटबाजीला खतपाणी घालण्यातच सर्व गटप्रमुखांनी प्राधान्य दिले. नांदेड महापालिकेत शिवसेनेला केवळ १४ जागा मिळाल्या. काँग्रेसला बहुमत मिळाले, तर त्या खालोखाल शिवसेनेला जागा मिळाल्या. त्यामुळे या पक्षाला विनासायास विरोधी पक्षनेतेपद मिळाले. विरोधी पक्षनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक दीपकसिंह रावत यांची निवड झाली. शिवसेना स्टाईलने एका आदेशानुसार रावत यांची निवड झाली असली, तरी ही बाब अन्य काही नगरसेवकांना खटकली.
रावत यांच्या निवडीनंतर स्थायी समितीवर वर्णी लागावी, यासाठी अनेकांनी वेगवेगळ्या मार्गानी प्रयत्न सुरू केले. यातूनच नव्या-जुन्या नगरसेवकांमध्ये स्पर्धा सुरू झाली. एक बुटक्या चणीचा माजी नगरसेवक आपल्या सौभाग्यवतीला स्थायी समितीवर पाठवण्यास इच्छुक आहे. त्यासाठी त्याने मोर्चेबांधणी केली. ही बाब अन्य नगरसेवकांना रुचली नाही. आम्हाला कोणी विश्वासात घेत नाही, आम्हाला मान मिळत नाही, अशी काही नगरसेवकांची भावना आहे. या पाश्र्वभूमीवर रावत विरोधी पक्षनेतेपदाचा पदभार घेताना पक्षाचे ९ नगरसेवक शासकीय विश्रामगृहात थांबले होते. आम्हाला निमंत्रण नाही, असे म्हणत त्यांनी बहिष्कार घातला. १४ पैकी ९ नगरसेवक नसल्याचे लक्षात आल्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी व स्वत: रावत विश्रामगृहात पोहोचले. त्यांनी नाराज नगरसेवकांची मनधरणी केली. भविष्यात नियुक्तया करताना आम्हाला विश्वासात घेतले जाईल, अशा शब्दांत या पदाधिकाऱ्यांनी आश्वासक केल्यानंतर हे नगरसेवक महापालिकेत आले. या सर्व घडामोडींवरून सेनेतील गटबाजी पुन्हा उघड झाली आहे. स्थायी समितीवर जाण्यासाठी काँग्रेसमध्ये आहे, तशी स्पर्धा शिवसेनेतही आहे. सेनेच्या वाटय़ाला स्थायी समितीच्या २ जागा मिळणार आहेत. या २ जागांवर वर्णी लावण्यासाठी नव्या-जुन्या नगरसेवकांमध्ये चांगलीच चुरस आहे. नऊ नगरसेवकांनी नाराजीच्या वृत्ताला दुजोरा दिला असला, तरी विरोधी पक्षनेते रावत यांनी मात्र गटबाजी नसल्याचे म्हटले आहे. गैरसमज झाला होता. तो दूर झाला आहे. आम्ही सगळे एक आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.