महापालिका निवडणुकीत शिवसेनेने ‘करून दाखविल्या’ची जाहिरातबाजी केली होती. पालिकेत सत्तेत असताना शिवसेनेने केलेल्या कामांच्या या जाहिरातबाजीत एसी बससेवेचा आवर्जून उल्लेख केला होता. शिवसेनेच्या प्रयत्नाने मुंबईत बेस्टची एसी बससेवा सुरू झाली हे मान्य केले तर आज मुंबईतील महत्त्वाचे चार एसी मार्ग बंद करण्याची जबाबदारीही सेनेला स्वीकारावी लागेल, असा टोला मनसेने लगावला आहे.
बेस्टचे एसी बसमार्ग तोटय़ात चालत असल्यामुळे गोराई ते कुलाबा, वडाळा ते बोरिवली, मुलुंड ते वाशी आणि मरोळ ते वाशी या चार मार्गावरील एसी बससेवा १ मार्चपासून बंद करण्यात येत असल्याचे पत्रकच काढण्याची वेळ ‘बेस्ट’वर आली आहे. बेस्टकडे सध्या २९० एसी बसेस असून त्यातील १९० गाडय़ा २७ मार्गावरून घावतात. बेस्टच्या म्हणण्याप्रमाणे एका गाडीसाठी दिवसाला सुमारे २२ हजार रुपये खर्च येत असून प्रत्येक बसकडून उत्पन्न मात्र अवघे नऊ हजार रुपये येते. २००७ पासून बेस्टने एसी बससेवा सुरू केली. तेव्हापासून कधीही या सेवा फायद्यात नसल्याचे आता प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. एकही एसी बसमार्ग फायद्यात नाही. वर वरंवार या बसेसमध्ये बिघाड होत असतो. यातच अनेक बसेसचा वॉरंटी कालावधीही संपल्यामुळे नवीन बस घेऊन तोटा वाढविण्यास प्रशासन तयार नाही.
मुळात एसी बसेसच्या किमती, त्यांचे आयुर्मान, डिझेलच्या वाढत्या किमती, गाडय़ांच्या देखभालीचा खर्च आणि प्रवाशांच्या संख्येचा अंदाज प्रशासन व शिवसेनेला नव्हता का, असा प्रश्न मनसेचे बेस्ट सदस्य दिलीप कदम यांनी उपस्थित केला. कोणाच्या भल्यासाठी कोटय़वधी रुपये खर्चून या बसगाडय़ा विकत घेण्यात आल्या आणि आता चार एसी मार्ग बंद केल्यानंतर आगारात पडून राहिलेल्या एसी बसेस भंगारात कोणाला देणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पालिका निवडणुकीपूर्वी सेनेने बेस्टची भाडेवाढ रोखून धरली आणि एसी बससेवेचे गोडवे गायले. आणि सत्ता येताच बेस्टची भाडेवाढ केली. आता एसी मार्ग तोटय़ात असल्याचे दाखवून हळूहळू संपूर्ण एसीबससेवाच बंद पाडण्याचा डाव आखला आहे. मुंबईत तोटय़ाच्या नावाखाली एसी बसमार्ग बंद करणे कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी कला आहे.

Story img Loader