शहरातील अमरप्रीत हॉटेलजवळील चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसविण्याचा, तसेच संग्रामनगर उड्डाणपुलास शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी घेण्यात आला. सोमवारी दिवसभर विविध संघटनांकडून बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रविवारच्या शुकशुकाटानंतर सोमवारी व्यवहार पूर्ववत सुरळीत झाले.
दरम्यान, शहराच्या हिमायतबाग परिसरात एका फलकावरून वाद निर्माण झाला होता.
सकाळी काही वेळ तणावाची स्थिती होती. तथापि पोलिसांनी व स्थानिक नेत्यांच्या पुढाकाराने तणाव निवळला. या परिसरात दिवसभर पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे औरंगाबाद शहरावर शोककळा पसरली होती. लाडक्या नेत्याच्या आठवणी जागवून शिवसैनिकांसह विविध संघटनांनी श्रद्धांजली अर्पण केली.
सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत श्रद्धांजली वाहिल्यानंतर शहरातील जालना रस्त्यावरील चौकात बाळासाहेबांचा पुतळा बसविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.    

Story img Loader