अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यास आलेले विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे आणि माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा शुक्रवारी पार पडलेला दौरा निव्वळ फार्स ठरल्याचे पहावयास मिळाले. एखादा आमदार वगळता स्थानिक पदाधिकाऱ्यांना फारशी माहिती नसल्याने दौऱ्याच्या नियोजनात सुसूत्रता नव्हती. यामुळे निफाड तालुक्यातील सधन भागाला विरोधी पक्षनेत्यांनी भेट दिली. तथापि, ज्या भागात पावसाने अतोनात नुकसान झाले, त्या भागाकडे ते फिरकले नाही. लासलगाव बाजार समितीत व्यापाऱ्यांमधील वादामुळे चार दिवसांपासून लिलाव बंद असल्याने शेतकरी भरडला जात आहे. पण, हा प्रश्नही शिवसेनेला बहुदा महत्वाचा वाटला नाही. त्यातच, प्रसारमाध्यमे वा शेतकरी यांच्याशी संवाद साधताना माजी विरोधी पक्ष नेत्यांकडून आजी विरोधी पक्षनेत्यांवर कुरघोडी करण्यात आल्याचे प्रत्ययास आले.
मागील आठवडय़ात सलग चार दिवस झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील २० हजार एकरवरील द्राक्ष, डाळिंब, भात, मका, सोयाबीन, भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले. प्रचंड नुकसान होऊनही सत्ताधाऱ्यांनी अद्याप नुकसानग्रस्त भागाची पाहणीही केलेली नाही. या पाश्र्वभूमीवर, शिवसेनेने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याचा निर्णय घेत वरचढ ठरण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते शिंदे यांच्या नाशिक दौऱ्याची माहिती गुरुवारी सायंकाळी उशिराने स्थानिक पदाधिकाऱ्यांना समजली. निफाडचे आ. अनिल कदम यांनी दौऱ्याचे नियोजन केल्याचे सांगितले जाते. यामुळे या दौऱ्यात आ. दादा भुसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले असले तरी बहुतेक जण नियोजनाविषयी अनभिज्ञ होते. सकाळी अकराला सुरू झालेल्या दौऱ्यात िशदे व कदम यांनी इगतपुरी तालुक्यात झालेल्या भात पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. कापणीला आलेला भात पावसाच्या तडाख्यात सापडल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने प्रती एकर ५० हजार रुपये मदत द्यावी तसेच पीक विमा योजनेत समाविष्ट शेतकऱ्यांना लाभ द्यावा, अशी मागणी शिंदे यांनी केली.
दिवसभरात विरोधी पक्ष नेत्यांनी माडसांगवी, शिरवाडे वणी, कोतारणे, वावी या भागात भेट देऊन द्राक्ष, मका, कांदा पिकाच्या नुकसानीची माहिती घेतली. निफाड हा तसा सधन परिसर. येथील काही शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन स्थिती जाणून घेण्यात आली. याच तालुक्यातील लासलगाव बाजार समितीत व्यापाऱ्यांमधील वादामुळे चार दिवसांपासून कांदा व इतर शेतमालाचे लिलाव बंद आहेत. त्याचा फटका हजारो शेतकऱ्यांना बसत आहे. विरोधी पक्षनेते त्याची दखल घेतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु, ती फोल ठरली. कारण काही भागांना भेट देऊन विरोधी पक्ष नेत्यांचा ताफा पुढे मार्गस्थ झाला. शेतकरी वा प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना वेगळाच प्रकार पुढे आला. बहुतांश ठिकाणी कदम हे स्वत: पुढे होऊन संवाद साधत होते. शेतीचे नुकसान व पाहणी दौऱ्याविषयी विचारणा केल्यावरही शिंदे यांच्याऐवजी कदम उत्तरे देण्यासाठी धडपड करत होते. यामुळे विरोधी पक्षनेते नेमके कोण, अशी चर्चा सुरू होती. जिल्ह्यात पेठ, सुरगाणा, देवळा आदी भागातही पावसाने मोठे नुकसान झाले आहे. काही निवडक भागांना भेट देऊन शिवसेनेने हा दौरा आटोपता घेतल्याचे पहावयास मिळाले.