वीज दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने पिंपळगाव (ता.भुदरगड) येथे शनिवारी मोर्चा काढला. रास्तारोको करीत शिवसैनिकांनी वाढीव वीज बिलांची होळी केली. या आंदोलनामुळे आजरा,भुदरगड, कागल या  तालुक्यांना जोडणाऱ्या पिंपळगाव या महत्त्वाच्या गावातील वाहतूक विस्कळीत झाली होती.
राज्य शासनाने भारनियमन मुक्त केल्याचे वृत्तपत्रातून जाहीर केले असले तरी अद्यापही ग्रामीण भागातील वीज भारनियमन पूर्वीइतकेच आहे, किंबहुना त्यामध्ये वाढ झाली आहे. शिवाय वीज दरवाढ केल्याने सामान्य ग्राहकांसह शेतकरी हैराण झाला आहे. वीज दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी शिवसेनेने पिंपळगाव येथे आज आंदोलन केले. जिल्हाप्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख प्रवीण सावंत, जिल्हा महिला संघटक सुषमा चव्हाण, तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, सुरेश पाटील, तालुका महिला संघटक मेरी डिसोझा यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. तिंन्ही तालुक्यांना जोडणाऱ्या चौकामध्ये वीज दरवाढीच्या निषेधाच्या घोषणा देत रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यामुळे या मार्गावरील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती. आंदोलनस्थळी भुदरगड महावितरण कार्यालयाचे उपअभियंता माने आले. त्यांच्या समोरच वाढीव वीज दरवाढीच्या बिलांची होळी करण्यात आली. माने यांना दिलेल्या निवेदनात वीज दरवाढ रद्द करा,तिमाही बिले मिळावीत, जबरदस्तीने बिले दिली तर शिवसेना मीटर रीडिंग करू देणार नाही, घरगुती व शेतीपंपाचे पूर्णत फिडर सेप्रेशन करावे, अतिरिक्त भारनियमन रद्द करावे, शेतीपंपाला दिवसा अखंड १० तास वीज मिळावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शासनाने वीज थकबाकीवर भारनियमन वाढविले आहे.अधिकारी बदलीकरीता अतिरिक्त भारनियमन लादतात हे शिवसेना सहन करणार नाही, असा इशारा देवणे यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा