महापालिका स्थायी समितीच्या सदस्य निवडीत शिवसेनेचे आमदार किशनचंद तनवाणी व संजय शिरसाट यांचा वरचष्मा राहिल्याने खासदार चंद्रकांत खैरे यांना हादरा बसला. प्रीती तोतला, सुरेंद्र कुलकर्णी, ऊर्मिला चित्ते व जगदिश सिद्ध यांच्या निवडीमुळे सत्ताधारी गटातील अंतर्गत उणीदुणी व कलहाची जोरदार चर्चा महापालिकेत रंगली. नव्याने निवडलेल्या सदस्यांपैकी काही नावांवर खासदार खैरे यांनी फुली मारली होती. मात्र, त्यांची नियुक्ती झाल्याने महापालिकेतील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने खासदार खैरे यांची प्रतिक्रिया मोठी बोलकी आहे. ते म्हणतात, ‘मी या सर्वापेक्षा वरिष्ठ आहे!’
महापालिकेत सकाळी स्थायी समिती सदस्यांची निवड करण्यात आली. शिवसेनेच्या प्रीती तोतला, सुरेंद्र कुलकर्णी, ऊर्मिला चित्ते व जगदिश सिद्ध यांची, तर काँग्रेसकडून सत्यभामा शिंदे, किरदत्त फातेमा, मीर हिदायत अली व परवीन कैसर खान यांची नियुक्ती झाली. खासदार खैरे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे गिरजाराम हळनोर यांच्याऐवजी गजानन बारवाल यांची नियुक्ती झाली. तर,सभागृह नेतेपदी सुशील खेडकर यांची निवड करण्यात आली.
स्थायी समितीवर शिवसेनेच्या दोन आमदारांचा वरचष्मा असल्याने खासदार खैरे यांना हा राजकीय धक्का मानला जात आहे. या नियुक्तीच्या अनुषंगाने कोणी थेट आरोप-प्रत्यारोप केले नसले, तरी शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस मात्र चव्हाटय़ावर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आमदार तनवाणी यांनी वेगवेगळ्या विषयांवर मांडलेले मत खासदार खैरे यांना न पटणारे होते. मंगळवारी स्थायी समिती सदस्य नियुक्तीच्या वेळी आमदार तनवाणी व शिरसाट, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आवर्जून उपस्थित होते. स्थायी समितीचे सभापतिपद या वेळी भारतीय जनता पक्षाकडे दिले जाणार आहे. युतीच्या या निर्णयात बदल केले जाणार नाहीत, तशा ‘काडय़ा’ कोणी करू नयेत, असा इशाराही खासदार खैरे यांनी दिला होता. मंगळवारीही त्यांनी स्थायी समितीचे सभापतिपद भाजपलाच दिले जाईल, असे आवर्जून नमूद केले.
स्थायी समितीत विकास जैन, नारायण कुचे, खान आगामीया खान, सविता घडामोडे, प्राजक्ता विश्वनाथ राजपूत, महम्मद मुजीबोद्दीन कदिरोद्दीन, नीलाबाई देविदास जगताप, समीर सुभाष राजूरकर, प्रिती संतोष तोतला, सुरेंद्र माणिकराव कुलकर्णी, जगदिश सिद्ध, ऊर्मिला चित्ते, सत्यभामा शिंदे, फिरदोस फादेमा, मीर हिदायत अली, परवीन कैसर खान यांचा समावेश होता.

Story img Loader