रिलायन्स समूहाच्या ४ जी योजनेसाठी ठाणे शहरात टॉवर उभारणीच्या प्रस्तावामुळे महापालिकेत आघाडीत असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बेबनाव निर्माण झाला असून कोणत्याही चर्चेविना यासंबंधीचे धोरण मंजूर होत असताना राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी धारण केलेले सूचक मौन काँग्रेस नेत्यांच्या जिव्हारी लागले आहे.
शिवसेनेचे सभागह नेते नरेश म्हस्के यांनी शहरात मोबाइल टॉवर उभारणीचे अतिशय महत्त्वाचे धोरण कोणत्याही चर्चेविना घाईघाईत मंजूर करून घेतल्याचे चित्र नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत पुढे आले. ठाणेकरांमध्ये मोबाइल टॉवरच्या उभारणीवरून संभ्रमाचे वातावरण असताना म्हस्के यांनी युतीच्या बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर करून घेतला. महापौर हरिश्ंचद्र पाटील यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना या मुद्दय़ावरून कोंडीत पकडण्याची चांगली संधी असताना राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यास तोंडदेखला विरोध केला आणि सभागृहातून काढता पाय घेतला, असा आरोप आता काँग्रेसचे नेते खासगीत करू लागले आहेत. या मुद्दय़ावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, संजय घाडीगावकर आणि राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे वृत्त असून महापालिकेतील मांडवलीबहाद्दर नेत्यांमुळे सर्व पक्षांतील नगरसेवकांचा एक मोठा गट कमालीचा अस्वस्थ झाल्याची चर्चा आहे.
ठाणे महापालिकेतील वेगवेगळ्या कंत्राटी कामांमध्ये मोठय़ा प्रमाणावर िरग होत असल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती यांनी केला होता. वैती यांचा रोख अभियांत्रिकी विभागातील काही ठराविक अभियंत्यांच्या दिशेने असला तरी यामुळे महापालिकेतील गोल्डन गँगच्या प्रतापांची जाहीर चर्चा रंगली होती. शिवसेनेचा एक ज्येष्ठ पदाधिकारी महापालिकेतील कंत्राटी कामांमध्ये कशा प्रकारे प्रभाव राखतो, हे उघड गुपित आहे. या पदाधिकाऱ्यामार्फत चालवलेली जाणारी टक्केवारीची गोल्डन गँग ठाण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. या पाश्र्वभूमीवर शहरात मोबाइल टॉवर उभारणीचे धोरण मंजूर होत असताना राष्ट्रवादीच्या बडय़ा पदाधिकाऱ्यांनी बाळगलेल्या सूचक मौनामागील नेमके कारण काय, याविषयी वेगवेगळ्या चर्चाना ऊत आला आहे.
रिलायन्ससाठी धोरणाची घाई
ठाणे शहरात काही हजारांच्या घरात बेकायदा मोबाइल टॉवरची उभारणी झाली असल्याचा मुद्दा मध्यंतरी शिवसेनेच्या नगरसेविका परिषा सरनाईक यांनी उपस्थित केला होता. या टॉवरच्या दुष्परिणामाविषयी काही प्रश्न सातत्याने उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे मोबाइल टॉवर उभारणीचा प्रस्ताव चर्चेला येत असताना त्यावर सखोल चर्चा होणे आवश्यक होते. तसेच हे धोरण रिलायन्स समूहाच्या ४ जी योजनेसाठी आखले जात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ४ जी योजनेचे टॉवर कोठे उभारले जाणार, त्यांची उंची किती असणार, कोणते रस्ते त्यामुळे खोदले जाणार याविषयी सविस्तर चर्चा होणे अपेक्षित होती. असे असताना शिवसेनेचे नरेश म्हस्के यांनी हा प्रस्ताव मंजूर होण्याची दाखवलेली घाई सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या विषयावर एकाही सदस्याला म्हस्के आणि कंपूने बोलू दिले नाही. विशेष म्हणजे याविषयी काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक होत असताना राष्ट्रवादीचे संजय भोईर वगळता बहुतांश ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी पाळलेले सूचक मौन काँग्रेस नेत्यांना अस्वस्थ करू लागले आहे. यावरून विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांच्या खासगी दालनात दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे वृत्त असून जगदाळे यांनी मात्र या वृत्ताचे खंडन केले आहे.
ठाणेकरांच्या जिव्हाळ्याच्या अशा मोबाइल टॉवर उभारणीच्या मुद्दय़ावर चर्चा होत नसेल ते निषेधार्ह असून या धोरणाविरोधात काँग्रेस पक्षाकडून न्यायालयात धाव घेतली जाईल, अशी माहिती नारायण पवार आणि संजय घाडीगावकर यांनी दिली. राष्ट्रवादीचे नेते सभागृहात का गप्प होते हे त्यांनाच विचारा, असेही पवार म्हणाले. दरम्यान, या मुद्दय़ावरून दोन्ही काँग्रेसमध्ये मतभेद नाहीत, असे हणमंत जगदाळे यांनी सांगितले, तर रिलायन्सचे टॉवर थांबविण्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आघाडीवर आहेत हे लक्षात असू द्या, असा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. शिवसेनेचे नरेश म्हस्के यांनी शहरात ४ जी योजना सुरू व्हावी यासाठी हे धोरण मंजूर केल्याचे स्पष्ट करत रिलायन्सला केंद्र सरकारने ही परवानगी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना या विरोधात बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का, असा सवाल म्हस्के यांनी उपस्थित केला.

Story img Loader