डोंबिवलीतील महापालिकेच्या शास्त्रीनगर आणि कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात गेल्या तीन महिन्यांपासून औषधांचा साठा संपला आहे. रुग्णांकडून पावत्या फाडून फक्त पैसे वसूल केले जातात. रुग्णांवर दोन महिन्यांपासून शस्त्रक्रिया केल्या जात नाहीत. मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. लीलाधर म्हस्के यांचा रुग्णालय प्रशासनावर कोणताही वचक राहिला नाही. अशा एकामागोमाग एक तक्रारी करत शिवसेनेने रुक्मिणीबाई रुग्णालयावर मोर्चा काढला.
शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अरिवद मोरे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाला मोर्चा काढण्याची वेळ येत असल्याने विरोधी पक्षाने या मोर्चाची खिल्ली उडवली आहे. मागील तीन महिन्यांपासून महापालिका रुग्णालयात रुग्णांना औषधे दिली जात नाहीत. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचा रुग्णालयातील कामकाजावर फारसा वचक राहिलेला नाही. त्यामुळे हा मोर्चा नेण्यात आला, अशी माहिती शिवसेना नगरसेवक अरिवद मोरे यांनी दिली. डॉ. म्हस्के यांना तात्काळ बडतर्फ करा. बंद पडलेल्या शस्त्रक्रिया सुरू करा, औषधांचा साठा तात्काळ उपलब्ध करून द्या, श्वान दंशाची इंजेक्शने उपलब्ध करून द्या, अशा प्रमुख मागण्या येत्या सात दिवसांत मंजूर केल्या नाहीत तर रुक्मिणीबाई रुग्णालयात शिवसेना स्टाइलने आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही शिवसेनेने दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा