वाशी येथील धनगर समाजाच्या पुजाऱ्यास समाजाने गावपातळीवर बहिष्कृत केले आहे. या प्रकरणाची चौकशी करून पुजाऱ्यास न्याय द्यावा, या मागणीचे निवेदन बुधवारी शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी संजय पवार यांना देण्यात आले.     
वाशी (ता.करवीर) येथील बिरदेव मंदिराचे धनगर समाजाचे पुजारी बाळू कोडिंबा पुजारी यांना गावातील धनगर समाजाने बहिष्कृत केले आहे, अशी माहिती समजल्यावर पुजारी बाळू यांना न्याय मिळावा यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांना निवेदन देते वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, वाशी येथे वीस वर्षांपूर्वी जमिनीच्या अंतर्गत वादातून सध्या बाळू पुजारी यांना त्रास दिला जात आहे. धनगर समाजातील ग्रामस्थांनी बाळू पुजारी यांना बहिष्कृत केले आहे. मंदिरापासून शेतीकामापर्यंत कोणत्याही कामात त्यांना सहकार्य केले जात नाही. समाजाच्या उपक्रमात सामावून घेतले जात नाही. राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी नगरीत हा प्रकार निंदनीय आहे. या प्रकारामुळे कोल्हापूरचे नाव बदनाम होण्यापूर्वी प्रशासनाने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.    
चर्चेत जिल्हाप्रमुख विजय देवणे, शैलेश पुणेकर, राजेंद्र पाटील, प्रभाकर सावंत, पप्पू कोंडेकर, संजय स्वामी, मनोज साळुंखे उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी पवार यांनी चौकशी करून सामोपचाराने हा प्रश्न मिटविण्याचे आश्वासन दिले.

Story img Loader