पक्षांतर्गत कुठलाही पेच उद्भवला की, अंतिम क्षणी मातोश्रीवरच तोडगा निघत असे. पण, अलीकडे कोणाचा कोणात पायपोस नाही, असे म्हणण्याइतपत स्थिती शिवसेनेत निर्माण झाली आहे. हे हताश उद्गार आहेत शिवसेनेच्या विचारांशी वर्षांनुवर्षांपासून बांधल्या गेलेल्या एका सामान्य व्यक्तीचे. २० ऑक्टोबरला शिवसेना बचाव आंदोलन होणे किंवा अशा पक्षांतर्गत लढय़ाची सुरूवात धुळ्यातून होणे ही पक्षाला मिळणारी गती आहे की अधोगती असा प्रश्न या निमित्त उपस्थित झाला आहे. दरम्यान, विद्यमान नेतृत्वावर आपला विश्वास असल्याचे पत्रक मोगलाई भागातील पदाधिकाऱ्यांनी काढले आहे. विद्यमान नेतृत्वावर टीका करणाऱ्यांनी इतक्या वर्षांत पक्षासाठी कोणते कार्य केले, असा प्रश्नही त्यांनी केला आहे.
अनेक वर्षांपासून भूषविलेली जिल्हा प्रमुख आणि महानगरप्रमुख ही पदे सोडावीत, भाजपशी युतीपोटी जाहीर केलेला जागा वाटपाचा तोडगा रद्द करावा आणि पदाधिकाऱ्यांनी निवडणूक लढवू नये अशा मागण्या घेऊन शिवसेना बचाव आंदोलन धुळ्यात उभे राहिले आहे. दुदैव म्हणजे हे आंदोलन होऊ नये किंवा पक्षाची ध्येय धोरणे न पाळल्यामुळे निर्माण होणाऱ्या नाराजीला खतपाणी मिळू नये म्हणून कोणी सल्ला मसलतीसाठी पुढे सरसावले नाही. उलट आंदोलनाची शहरभर फलक झळकल्याने केवळ शिवसेना नाही तर सर्वपक्षीयांमध्ये त्याबद्दल उत्सुकता आहे.
गतवेळी महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला १८ जागा देण्यात आल्या. त्यापैकी केवळ तीन जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आले. शिवसेना महापालिकेतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असताना आणि या पक्षाकडे महापौरपदाचा उमेदवार असताना भाजपने महापौरपद पटकावले. या निवडीवेळी सेनेचे उमेदवार चुडामण मोरे आश्चर्यकारकपणे बेपत्ता होतात कसे हे कोडे आजही उलगडलेले नाही. या उदाहरणासोबत विरोधकांना मार्ग मोकळा करण्यासाठी शिवसेनेतून कोण कशी रणनिती आखतो, याची उजळणी या आंदोलनानिमित्त होत आहे. जिल्हाचे संपर्कप्रमुख विजय रावराणे यांनी तर बंड पुकारणाऱ्या संभाव्य आंदोलनकर्त्यांवर पक्षांतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.
धुळे शहर व ग्रामीण भागातही शिवसेनेने आपले अस्तित्व प्रभावीपणे अधोरेखीत केले. शिवसेना इतक्यावरच थांबली नाही. धुळ्याच्या पहिल्या महापौरपदाचा मान मिळविला तसे ग्रामीण मंत्रालय जिल्हा परिषदही ताब्यात घेतली. या ठिकाणी शिवसेनेचे सुधीर जाधव अध्यक्ष झाले. या सगळ्या घटना शिवसेना विरोधकांच्या छातीत धडकी भरविणाऱ्या ठरल्या असताना सद्यस्थितीत पक्षांतर्गत घोंगावू लागलेले वादळ शमले पाहिजे असे निष्ठावंत शिवसैनिकांना वाटते. वरिष्ठांनी नाराजांची समजूत काढली तरी या वादाची गुंडाळणी होईल, असे अनेकांना वाटते. पण, अवघ्या दोन दिवसावर शिवसेना बचाव आंदोलन येवून ठेपले असताना नेमका शिवसेनेचा बचाव होतो की, दोन्ही प्रमुख पदांचा याचाही निकाल लागणार आहे. विरोधकांसाठी हे आंदोलन म्हणजे करमणुकीचा भाग झाले आहे.