महानगर पालिकेच्या विशेष महासभेत सोमवारी स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या दोन जागांसाठी आणि शिक्षण मंडळाच्या १६ जागांसाठी निवड करण्यात आली.
पालिका सभागृहात झालेल्या विशेष महासभेत स्थायी समितीतून शिवसेनेचे दोन सदस्यांनी राजीनामे दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागांवर  शैलेश ढगे आणि शोभा फडोळ यांची निवड करण्यात आल्याचे महापौर अशोक मुर्तडक यांनी जाहीर केले. त्यानंतर शिक्षण मंडळाच्या सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली. या सदस्यांमध्ये गणेश चव्हाण, मीना माळोदे, विशाल घोलप, अर्चना जाधव, रेखा बेंडकुळे, हर्षां बडगुजर, मंगला आढाव, नंदिनी जाधव, वत्सला खैरे, योगिता आहेर, ज्योती गांगुर्डे, संजय चव्हाण, उषा अहिरे, राजेंद्र महाले, सुनिता निमसे, सिंधु खोडे यांचा समावेश आहे. निवड झालेल्या सदस्यांमध्ये मनसे ५, शिवसेना ३, राष्ट्रवादी ३, भाजप २, काँग्रेस २ आणि अपक्ष एक अशी विभागणी आहे. या सर्व सदस्यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर गुरूमित बग्गा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, स्थायी समिती सदस्य निवडीवरून शिवसेनेतील मतभेद पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आले. सरूयकात लवटे यांनी शैलेश ढगे यांना सदस्य म्हणून स्थान दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. ढगे हे पक्षविरोधी कारवाया करत असतानाही त्यांना स्थान देण्यात आले.
याबद्दल आपण पक्ष प्रमुखांकडे दाद मागणार आहोत, असा त्रागा लवटे यांनी केला. पक्षाचे नेते अजय बोरस्ते यांनी मात्र याप्रकरणी स्थानिक पातळीवर कोणतेही राजकारण झालेले नसून सचिव अनिल देसाई यांच्याकडून आलेली नावे जाहीर करण्यात आल्याचे नमूद केले. शिवसेनेतील हे अंतर्गत राजकारण यापुढे कोणते वळण घेते हे सांगणे अवघड असून लवटे व ढगे हे दोघेही नाशिकरोड भागातील आहेत.  

Story img Loader