बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून जबाबदारी पेलणारे उध्दव ठाकरे हे शनिवारी प्रथमच मालेगाव दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यानिमित्त मालेगाव शहर व तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले असून त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्तांच्या वेदना जाणून घेणे एवढय़ापुरतेच या दौऱ्याचे महत्व सीमित नाही तर दुष्काळाचे दु:ख भविष्यात बऱ्यापैकी हलके करण्याची क्षमता असलेल्या जलसंधारणाच्या विविध कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे मालेगावच्या दृष्टिने या दौऱ्याचे महत्व अधिक आहे.
दुष्काळाची परिस्थिती जाणून घेण्यासह आ. दादा भुसे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या गिरणा-मोसम नद्यांवरील बहुचर्चित कोल्हापूर पध्दतीच्या सात बंधाऱ्यांचे भूमिपूजन आणि नदीजोड कालवे सर्वेक्षणाची सुरूवात ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. गिरणा नदीवर दाभाडी, पाटणे, सातभाई आणि मोसम नदीवर वडगाव, वडेल, काष्टी व कोठरे येथे सिमेंट बंधारे तसेच हरणबारी धरणातील मोसम नदीचे पूरपाणी बोरी व कान्होळी नदीत आणि अजंग-सातमाने येथील साठवण तलावात टाकण्याच्या कामाच्या सव्‍‌र्हेक्षणास शासनाने मंजुरी दिली आहे. नदीजोड कालवा प्रकल्प व बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाल्यास तालुक्यातील सततच्या टंचाईवर उत्तर मिळू शकेल.
स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी महाराष्ट्राचे सरकारी कालव्याद्वारे होणारे सिंचनक्षेत्र सहा टक्के असताना मालेगाव तालुक्याचे सिंचनक्षेत्र सात टक्के होते. आता राज्याचे सिंचनक्षेत्र १७ टक्क्यांवर पोहोचले असताना तालुक्याचे सिंचनक्षेत्र जवळपास शुन्य टक्क्यापर्यंत घसरले आहे. दुष्काळ व घटत्या सिंचनक्षेत्रामुळे तालुक्यातील शेतीची अवस्था केविलवाणी झाली आहे. सुरगाणा तालुक्यातील पश्चिमवाहिनी नद्यांचे गुजरातमध्ये समुद्राला जाणारे पूरपाणी गिरणा (तापीचे उपखोरे) खोऱ्यात वळविण्याच्या योजनेचा यापूर्वी अनेकदा उहापोह केला गेला. नार-पार प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महत्वाकांक्षी योजनेमुळे केवळ मालेगावच नव्हे तर तापी तसेच गोदावरी खोऱ्याचा पाणीप्रश्न सुटण्यास मोलाची मदत होऊ शकेल. अनेक निवडणुकांच्या प्रचारात हा मुद्दा अग्रभागी राहिला. तथापि तालुका पातळीवर वजनदार असलेले नेते वरीष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्यात कमी पडले. त्यामुळेच ही योजना आजतागायत मार्गी लागू शकली नाही.
अतीतूटीचे खोरे म्हणून गणना होणाऱ्या गिरणा खोऱ्यात पाच दलघफु क्षमतेपेक्षा मोठे बंधारे बांधण्यावर शासनाने र्निबध लादले. अशा परिस्थितीत जागा उपलब्ध असताना व लोकांची सातत्याने मागणी असतांना या भागात नवीन मोठे बंधारे बांधता येत नव्हते.आमदार भुसे यांनी यासंबंधी अथक पाठपुरावा करत खास बाब म्हणून या बंधाऱ्यांच्या कामांना मंजुरी मिळविण्यात यश मिळवले. या शिवाय बागलाण तालुक्यातील हरणबारी धरणाचे तळवाडे धरणात पडणारे पूरपाणी मालेगाव तालुक्यातील बोरी व कान्होळी नदीत सोडून ठिकठिकाणचे तलाव भरण्याची योजना भुसे यांनी मांडली आहे. या योजनेच्या सर्वेक्षणालाही शासनाने मान्यता दिली आहे. विरोधी पक्षात असतानाही कामे मंजूर करण्यात भुसे यांना यश आल्याने त्याचे मोल अधिकच म्हणावे लागेल.
उध्दव ठाकरे हे ओझपर्यंत विमानाने येणार आहेत. तेथून ते महामार्गाने मालेगावी पोहोचतील. दाभाडी येथे रोकडोबा मंदिराजवळ भूमिपूजनाचा प्रातिनिधीक स्वरूपातील कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी मालेगावच्या एमएसजी कॉलेज मैदानावर मेळाव्याला ते मार्गदर्शन करतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा