महापालिका निवडणुकीमध्ये मनसेने हिसकावून घेतलेल्या दादरवर पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेनेने प्रसाधनगृहापासून सुरुवात केली आहे. आपल्या पदाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मोडकळीस आलेले स्वातंत्र्यवीर सावरकर मंडईमधील प्रसाधनगृह पुन्हा आधीच्याच कंत्राटदाराला मिळावे यासाठी शिवसेना नेते प्रयत्नशील आहेत. या प्रसाधनगृहाची पालिकेच्या नियोजन व संकल्पचित्रे खात्यामार्फत पुनर्बाधणी करण्यात येणार होती. परंतु शिवसेनेच्या दबावाखाली आता पालिका अधिकारी हात झटकू लागले आहेत.
महापालिकेने १९३५ मध्ये डिसिल्वा रोड आणि रानडे रोड यांच्या मध्ये बांधलेल्या मंडईत मासळी, भाज्या, फळे, गरम मसाले आदी विक्रेत्यांचे २५० गाळे आहेत. एवढय़ा साऱ्यांसाठी एकच शौचालय आहे. २५० गाळेधारक, तेथील कर्मचारी आणि खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांपैकी काही मंडळी या प्रसाधनगृहाचा वापर करतात. मंडईतील प्रसाधनगृह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मित्र मंडळा’ला चालविण्यासाठी देण्यात आले होते. मात्र देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने प्रसाधनगृह धोकादायक बनले. मनसेने आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांना दमात घेऊन हे शौचालय तोडण्यास भाग पाडले. मात्र नियमबाह्य़ काम केल्यामुळे कारवाईचा बडगा उगारला जाऊ नये यासाठी मनसेने या प्रकरणातून अलगद काढता पाय घेतला.
पालिकेच्या नियोजन व संकल्पचित्रे खात्यामार्फत दोन महिन्यांमध्ये या शौचालयाची पुनर्बाधणी करण्यात येईल, असे आश्वासन पालिकेने गाळेधारकांना दिले होते. मात्र हे शौचालय पुन्हा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मित्र मंडळा’ला देखभालीसाठी मिळावे यासाठी शिवसेनेने हालचाली सुरू केल्या आहेत. तशा तोंडी सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे एक कोटी रुपयांखालील कामे या खात्यामार्फत केली जात नाहीत, असे सांगत पालिका अधिकाऱ्यांनी हात वर केले आहेत.
शौचालय पुन्हा त्याच मंडळाला देखभालीसाठी देण्यात आले तर भविष्यात पुन्हा त्याची दूरवस्था होईल, अशी भीती गाळेधारकांनी व्यक्त केली आहे. तसेच हे शौचालय पालिकेनेच बांधावे आणि त्याची देखभाल मंडईतील गाळेधारकांकडे सोपवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. मंडईतील हे शौचालय आपल्या पदाधिकाऱ्याला मिळवून देऊन दादरमध्ये आपली पहिली विजयी पताका फडकविण्यासाठी शिवसेना नेते उतावीळ झाल्याचे दिसून येत आहे.