* एकनाथ शिंदे-देवळेकर जोडगोळीचा विजय * देवळेकरांसाठी विधानसभेचा मार्ग प्रशस्त * शिंदे विरोधकांना धक्का
काँग्रेस पक्षाचा एकेकाळचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कल्याणमधील कर्णिक रोड प्रभागात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने अनपेक्षितपणे सुमारे अडीच हजार मतांनी विजय मिळवत काँग्रेस आघाडीला धोबीपछाड देताना स्व:पक्षातील हितशत्रूंनाही धक्का दिल्याचे चित्र सोमवारी निकालानंतर दिसून आले. चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजातील मतदारांचा भरणा असलेला आणि कल्याणातील सुशिक्षितांचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या या प्रभागात शिवसेनेने प्रभुनाथ भोईर यांच्यासारखा गुन्हेगारी पाश्र्वभूमीचा ऊमेदवार ऊतरवूनही काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी सुपडा साफ झाला. या विजयामुळे शिवसेनेचे जिल्हासंपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांची संघटनेवरील पकड पुन्हा एकदा घट्ट झाली असून स्थानिक नेते राजेंद्र देवळेकर यांचा आगामी विधानसभा उमेदवारीचा मार्ग प्रशस्त झाल्याचीही चर्चा आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भोंगळ कारभार, शहरात सोयी-सुविधांचे वाजलेले तीनतेरा, युती असतानाही शिवसेना-भाजपमधील सुंदोपसुंदी असा एकंदर कारभार असतानाही या पोटनिवडणुकीत मतदारांनी शिवसेनेच्या पारडय़ात मतांचे भरभरून दान टाकले. या प्रभागात माजी नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची मानली जात होती. तसेच जिल्हासंपर्क म्हणून आमदार एकनाथ शिंदे यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. ठाणे महापालिकेत शिवसेनेची अवस्था सध्या बिकट बनली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची संघटनेवर पकड पूर्वीप्रमाणे राहिली नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत यापूर्वी शिंदे यांचा शब्द प्रमाण मानला जायचा. महापालिका निवडणुकीत त्यांनी घेतलेली मेहनतही निर्णायक ठरली. कल्याणच्या महापौरपदी राजेंद्र देवळेकर यांची निवड व्हावी, अशी शिंदे यांची इच्छा होती. असे असताना वैजयंती भोईर यांची निवड करून मातोश्रीने एकप्रकारे शिंदे यांना धक्का दिल्याची चर्चा होती. कर्णिक रोडच्या पोटनिवडणुकीत शिंदे यांचा पक्षातील विरोधी गट देवळेकरांच्या मदतीसाठी ऊतरलाच नाही, असेही शिवसेनेच्या गोटात बोलले जात होते. महापालिकेतील वरिष्ठ पदाधिकारी कर्णिक रोड प्रभागातील प्रचारात दिसत नव्हते. एकनाथ िशदे प्रभागात आले की हजेरी लावायची आणि नंतर देवळेकर यांची पाठ सोडायची, असे प्रकार येथे सुरू होते. त्यामुळे या विजयामुळे शिंदे यांची संघटनेवरील पकड पुन्हा एकदा घट्ट झाल्याची चर्चा जिल्ह्य़ातील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कर्णिक रोडच्या या पोटनिवडणुकीला महापौर वैजयंती भोईर आणि आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात कल्याणात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या सुप्त स्पर्धेची पाश्र्वभूमीही होती. त्यामुळे वर वर पाहता हा विजय काँग्रेसला चारी मुंडय़ा चीत करणारा ठरला असला, तरी शिंदे आणि देवळेकरांचे कल्याणातील वर्चस्वही यामुळे एकप्रकारे सिद्ध होऊ लागले आहे. तसेच कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघावर एकनाथ शिंदे यांच्या गटाचा दावा प्रबळ झाल्याची चर्चा रंगली असून देवळेकरांना स्विकृत नगरसेवक म्हणून महापालिकेत घेऊन थेट विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची दावेदारी पक्की करायची, अशी रणनीतीही शिवसेनेच्या एका गटाकडून खेळली जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा