महापालिका, नगरपालिकांच्या सभागृहांमधील नगरसेवकांचा राडा ही काही नवी घटना राहिलेली नाही. मात्र, बुधवारी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात शिवसेना आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ज्या प्रकारे धुडगूस घातला. त्यामुळे शहराचे पालकत्व भूषविणाऱ्या महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला असून तब्बल ५२५ सुरक्षारक्षकांची भली मोठी फौज पदरी बाळगणाऱ्या महापालिकेत कुणीही यावे आणि टपली मारून जावे, असे अजब चित्र ठसठशीतपणे समोर आले आहे.
 ‘टीएमटी’ सभापतीपदासाठी अर्ज भरण्यावरून बुधवारी झालेल्या गोंधळात नगरसेवक, वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते, सचिंत रजेवर असलेले अट्टल गुन्हेगार, भाईमंडळींचा अगदी मोकळा वावर मुख्यालयात सुरू होता. ठाणेकरांचे ट्रस्टी म्हणविणारे नगरसेवक कायदा धाब्यावर बसवून एकमेकांना चोप देत होते, तर मुख्यालयाच्या आवारातच गाडय़ांची मोडतोड सुरू होती. विशेष म्हणजे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर कार्यकर्त्यांची दमबाजी, धुडगूस सुरू होता, त्यामुळे कर्मचारीही धास्तावल्याचे चित्र होते. एवढे सर्व होत असताना महापालिकेचे सुरक्षारक्षक उघडय़ा डोळ्यांनी हे सर्व पाहात होतेच, शिवाय आयुक्त असीम गुप्ता यांनी गुरुवारी उशिरापर्यंत याप्रकरणी साधा गुन्हा नोंदविण्याची औपचारिकताही पूर्ण केली नव्हती. त्यामुळे नव्या आयुक्तांच्या बोटचेपे धोरणाविषयी ठाणेकरांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त होत असून याप्रकरणी काही सामाजिक कार्यकर्ते न्यायालयात धाव घेण्याची तयारी करू लागले आहेत.
रक्षक कसले..?
इनमिन दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना ठाणे महापालिका मुख्यालयात युती आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी कारण नसताना धुडगूस घातला.मनोज िशदे, मनोज प्रधान, नरेश म्हस्के, रवींद्र फाटक , हणमंत जगदाळे, संजय मोरे, रमेश वैती असे पहिल्या फळीतील नेते एकमेकांना यथेच्छ शिवीगाळ तर करतच होते, शिवाय हाणामारीतही आघाडीवर होते. हे सगळे महापालिका तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोळ्यादेखत सुरू होते. एवढे सगळे होत असताना महापालिकेचे सुरक्षारक्षक कोठे होते, असा सवाल आता उपस्थित केला जात असून खासगी आणि आस्थापनेवर पाचशेहून अधिक सुरक्षारक्षकांचा ताफा बाळगणाऱ्या महापालिकेत धुडगूस घालणाऱ्यांना रोखायला एकही सुरक्षारक्षक पुढे सरसावला नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होऊ लागला आहे. हाणामाऱ्या करणाऱ्या कार्यकर्त्यांचे जथ्थेच्या जथ्थे मन मानेल त्या मार्गाने मुख्यालयात थडकत होते. वाट्टेल तसा धुडगूस घातल्यानंतरही या कार्यकर्त्यांना, नगरसेवकांना तसेच नेत्यांना पोलिसांनीही अटक केली नाही आणि महापालिकेनेही त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे ठाण्यातील दादागिरीला एक प्रकारे राजमान्यता असल्याचे चित्र ठसठशीतपणे पुढे आले आहे.
अशा प्रशासकाबद्दल काय बोलावे?
ठाणेकरांचे प्रशासकीय केंद्र असलेले मुख्यालय जर सुरक्षित नसेल तर ठाणेकर कसे सुरक्षित असतील, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते नितीन देशपांडे यांनी उपस्थित केला. मुख्यालयात हाणामाऱ्या, गाडय़ांचे तोडफोड, सदस्यांची पळवापळवी होते आणि आयुक्त असीम गुप्ता याविषयी साधा ‘ब्र’देखील उच्चारत नसतील तर अशा प्रशासकाबद्दल काय बोलावे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बिल्डरांची कामे मार्गी लावण्यात मग्न असलेल्या प्रशासनाने राजकीय पक्षांच्या धुडगुसाला आवर घालावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा