आपल्या सदस्यांना लठ्ठ बोनस मिळवून देऊन प्रतिस्पर्धी कामगार संघटनेला खिंडार पाडण्याचे शिवसेनाप्रणीत म्युनिसिपल कामगार, कर्मचारी सेनेचे मनसुबे दस्तुरखुद्द महापौरांनीच उधळून लावल्यामुळे कामगार सेनेचे पदाधिकारी कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. महापौर आडवे आल्याने प्रशासनाने पुन्हा एकदा सेनेची मागणी गुंडाळून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ ४०० रुपये अधिक बोनस जाहीर केला. परिणामी सेनेचे पदाधिकारी चांगलेच तोंडघशी पडले आहेत.
महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त २०,००० रु. सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी एका पत्राद्वारे म्युनिसिपल कामगार, कर्मचारी सेनेने महापौर सुनील प्रभू यांना केली होती. मात्र या पत्राला चक्क केराची टोपली दाखविण्यात आली आणि कोणत्याही कामगार संघटनेला विचारात न घेता पालिका कर्मचाऱ्यांना १२,५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा सुनील प्रभू आणि सीताराम कुंटे रजेवर असल्यामुळे आयक्तपदाची सूत्रे हात असलेले अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांनी केली. गेल्या वर्षी पालिका कर्मचाऱ्यांना १२,१०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यंदा त्यात केवळ ४०० रुपयांनी वाढ केल्यामुळे पालिका कर्मचारी नाराज झाले आहेत.
आयुक्तपदाची सूत्रे सुबोधकुमार यांच्या हाती असताना कामगार संघटनांनी सहाव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी संपाची हाक दिली होती. परंतु सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे म्युनिसिपल कामगार, कर्मचारी सेनेला आयत्या वेळी संपातून काढता पाय घ्यावा लागला आणि प्रशासनाबरोबर वेतन करार करावा लागला होता. यामुळे नाराज झालेल्या पालिका कर्मचाऱ्यांनी या संघटनेला रामराम ठोकत शरद राव यांच्या म्युनिसिपल मजदूर युनियनमध्ये आश्रय घेतला होता. यंदा बोनसच्या निमित्ताने हे खिंडार थोडेतरी बुजविण्याचे प्रयत्न शिवसेनेच्या संघटनेकडून करण्यात येत होते. २०,००० रुपये बोसनची मागणी करून कर्मचाऱ्यांच्या पदरात १५,००० रुपये पाडण्याचा मनसुबा सेनेचा होता. पण पालिका प्रशासनाने महापौरांच्या मदतीने तो उधळून लावला. महापौरांचा अपमान होऊ नये यासाठी त्यांनी जाहीर केलेल्या बोनसचे स्वागत करण्यापलीकडे म्युनिसिपल कामगार, कर्मचारी सेनेच्या हाती आता काहीच उरलेले नाही.
‘पुढील वर्षी तरी चांगला बोसन द्यावा’
सुबोधकुमार यांनी कामगार संघटनांना विचारात न घेता बोनस जाहीर करण्याचा घातलेला पायंडा प्रशासन आणि सुनील प्रभू यांनी यावर्षीही सुरूच ठेवला. २०,००० रुपयांची मागणी विचारात न घेताच १२,५०० रुपये बोनस जाहीर करण्यात आला. आता त्याचे स्वागतच करावे लागेल, अशी खंत व्यक्त करून म्युनिसिपल कामगार, कर्मचारी सेनेचे अध्यक्ष बाबा कदम म्हणाले की, पुढील वर्षांच्या अर्थसंकल्पात सानुग्रह अनुदानासाठी भरीव तरतूद करावी आणि पुढील दिवाळीत तरी कर्मचाऱ्यांना मोठा बोनस द्यावा.

Story img Loader