जिल्हा परिषदेत शिवसेनेची सत्ता असल्याने मागासक्षेत्र विकास निधी व दलित वस्ती सुधार योजनेच्या निधी वाटपाला पालकमंत्री वारंवार स्थगिती देत आहेत. मार्चच्या तोंडावर निधी खर्च न झाल्यास त्याला पालकमंत्री जबाबदार राहतील. विकासकामाला आड येणाऱ्यांना शिवसैनिक आडवे पाडतील, असा इशारा माजी आमदार गजानन घुगे यांनी दिला.
या वर्षी निधी वाटपावरून जिल्हा परिषद सत्ताधारी व विरोधकांतील वाद चांगलाच शिगेला पोहोचला. पालकमंत्र्यांनी निधीवाटपाला स्थगिती दिल्याने पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा जि. प. उपाध्यक्ष उध्दवराव गायकवाड यांनी दिला होता. या पाश्र्वभूमीवर पालकमंत्री वर्षां गायकवाड यांनी हिंगोलीत येऊन शिवसेनेच्या नेत्यांशी बंद खोलीत चर्चा झाली.
याच मुद्यावर उद्या (शनिवारी) पालकमंत्री गायकवाड यांनी चर्चेसाठी वेळ दिला आहे.  घुगे यांनी सांगितले की, मागासक्षेत्र विकास, दलित वस्ती सुधार योजना निधीवाटपाचे काम नियमाने घालून दिलेल्या चौकटीत बसून सत्ताधारी करीत आहेत.
 मात्र, केवळ शिवसेनेची सत्ता जि. प.मध्ये असल्याने पालकमंत्री वारंवार निधी वाटपाला स्थगिती देऊन विकासकामाला खीळ घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. महत्त्वाच्या रिक्त जागा भरण्याकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. शनिवारी सर्व मुद्यांवर चर्चा करण्यासाठी वेळ दिला आहे, यावर चर्चा होईल. विकासकामात शिवसेना आड येणार नाही. मात्र, कोणी आड येत असल्यास शिवसैनिक जिल्हाबंदी करतील, असा इशारा घुगे यांनी दिला.