राज्यात दुष्काळ आहे, बायाबापडय़ा घर सोडून रोजगार हमीच्या कामावर जात आहेत आणि काहीजण या संकटाचा फायदा घेऊन इस्टेट वाढवायचा प्रयत्न करतात, त्यापेक्षा आत्महत्या का करीत नाहीत, असा जळजळीत सवाल करून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी संवेदनाहीन झालेल्या राजकीय व प्रशासकीय अवस्थेवर कोरडे ओढले.
भारतीय संस्कृती सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने पुरंदरे यांना स्वर्गीय मदनगोपाल व्यास पुरस्कार प्रदान करण्यात आला. आज सकाळी यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमाकांत व्यास, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाम जाजू, आमदार अनिल राठोड, उपमहापौर गीतांजली काळे, योगेश्वर व्यास, डॉ. दिपक आदी व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यात्म व शिवचरित्र यांचा अनोखा संगम या कार्यक्रमात झाला.
वयाच्या ९१ व्या वर्षीही प्रकृती स्वास्थ्य सांभाळून असलेल्या पुरंदरे यांनी शिवचरित्राचा संदर्भ देत आजच्या सामाजिक तसेच राजकीय व्यवस्थेवर टिका करत शिवचरित्रातून काय घ्यायचे त्याचे मार्गदर्शन केले. आग्य््रााला औरंगजेबाच्या कैदेत महाराज पडलेले असताना इकडे राजमाता जिजाऊसाहेबांपासून ते सिंधर्दुगाचे बांधकाम करणाऱ्या सामान्य मजुरापर्यंत प्रत्येकजण स्वराज्याचे काम चोख करत होता. ही दृष्टि त्यांच्याकडून आपण घेणार की नाही असे पुरंदरे म्हणाले.
आग्य््रााच्या कैदेतून सुटका करून घेतल्यानंतर महाराज सत्कार समारंभ स्विकारत बसले नाहीत तर फक्त पाचच दिवसांनी त्यांनी थेट गोव्यावर स्वारी करण्याचे बेत आखला व त्याच्या तयारीसाठी ते गोव्याच्या सिमेवर दाखल झाले. त्यांचे हे विचार, आचार आज आपण किती अंमलात आणतो असा सवाल पुरंदरे यांनी केला. इतिहासापासून प्रेरणा घ्यायची असते, फक्त पुतळे उभे करून चालत नाही, त्यामागचा विचार घ्यायचा असतो, अंमलात आणायचा असतो असे त्यांनी सांगितले.
शाम जाजू यांनी व्यास कुटुंबाच्या अध्यात्मिक वारशाचे महत्व विशद केले. त्यांच्या नावाचा पुरस्कार पुरंदरे यांच्यासारख्या ॠषीतुल्य व्यक्तीमत्वाला मिळतो आहे ही आनंदाची व अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले. पुरंदरे यांच्याबाबतच्या दोन आठवणीही त्यांनी सांगितल्या. संयोजक रमाकांत व्यास यांनी विचार व आचार याचे महत्व सांगितले. पुरंदरे यांनी संकल्प केला व त्याच्या सिद्धीसाठी संपुर्णोयुष्य झोकून दिले. उक्ती व कृती यांचा संगम त्यांच्या जीवनात आहे. आजच्या समाजाला त्यांच्यासारख्या अनेक व्यक्तीमत्वांची गरज आहे असे ते म्हणाले.
आमदार राठोड, उपमहापौर श्रीमती काळे, डॉ. दिपक यांचीही यावेळी भाषणे झाली. मधुसुदन मुळे यांनी स्वागत व प्रास्तविक केले. व्यास यांच्या हस्ते पुरंदरे यांना पुरस्कार वितरीत करण्यात आला. त्यांना दिलेल्या सन्मानपत्राचे वाचन योगेश्वर व्यास यांनी केले. कार्यक्रमासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी पाठवलेल्या शुभेच्छांचे वाचन करण्यात आले. चकोर मुळे व सहकाऱ्यांच्या वेदमंत्र गायनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. डॉ. मधुसुदन बोपर्डीकर, श्रेया कुलकर्णी व सहकाऱ्यांनी इशस्तवन व पसायदान म्हटले. शशिकला बिहाणी यांनी सुत्रसंचालन केले. अरूण झंवर यांनी आभार मानले.
संवेदनाहीन राजकारणी व प्रशासनावर शिवशाहीरांचे कोरडे
राज्यात दुष्काळ आहे, बायाबापडय़ा घर सोडून रोजगार हमीच्या कामावर जात आहेत आणि काहीजण या संकटाचा फायदा घेऊन इस्टेट वाढवायचा प्रयत्न करतात, त्यापेक्षा आत्महत्या का करीत नाहीत, असा जळजळीत सवाल करून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी संवेदनाहीन झालेल्या राजकीय व प्रशासकीय अवस्थेवर कोरडे ओढले.
First published on: 18-03-2013 at 01:00 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivshahir attacked on insensitive politicians and govt