मुंबईत क्षयरोगाचे, त्यातही एमडीआर टीबी म्हणजे प्रचलित औषधांना प्रतिसाद न देणाऱ्या क्षयाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. हा वाढता धोका लक्षात घेऊन महापालिकेने शिवडी येथील पालिकेच्या क्षय रुग्णालयाचा विस्तार करण्याचा त्याचप्रमाणे अवघ्या दोन तासांमध्ये एमडीआर टीबीचे निदान करणारी ‘जीन एक्स प्रयोगशाळा’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मंगळवारी विस्तारित रुग्णालय व अत्याधुनिक प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
गोवंडी व धारावीमध्ये मोठय़ा प्रमाणात क्षयरोग व एमडीआरचे रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेने युद्धपातळीवर क्षयरोग निर्मूलनाचे काम हाती घेतले. तथापि प्रचलित चाचणी पद्धतीत एमडीआर टीबीचे निदान होण्यासाठी लागणारा वेळ ही एक प्रमुख समस्या बनली होती. त्यातच या रुग्णांची लागण अन्य व्यक्तींना होण्याची भीती लक्षात घेऊन अतिरिक्त पालिका आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी ‘जीन एक्स’ उपकरणांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार धारावी, गोवंडीसह पालिकेच्या काही रुग्णालयांसाठी या उपकरणाची खरेदी करण्यात आली. या उपकरणाच्या साहाय्याने अवघ्या दोन तासांत आजाराचे निदान होत असल्यामुळे वेळीच रुग्णावर उपचार करून क्षयरोग आटोक्यात आणणे शक्य होऊ शकते, असे मनीषा म्हैसकर यांनी सांगितले.
आतापर्यंत या उपकरणाच्या साहाय्याने धारावी येथे १०,९४० संशयित टीबी रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये २९९३ रुग्णांना क्षयरोग असल्याचे आढळून आले, तर १०६३ एमडीआर टीबीचे रुग्ण आढळून आले.
गोवंडी येथे एमडीआर टीबीचे ७१६ रुग्ण आढळले असून वेळीच या रुग्णांना शोधून उपचार केल्याने संसर्ग रोखण्यास मोठी मदत झाली. आतापर्यंत एमडीआर टीबीमुळे ७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पालिकेने पूर्व व पश्चिम उपनगरे आणि शहरात तीन ठिकाणी जीन एक्स मशीन उपलब्ध करून दिली आहेत.
त्याचप्रमाणे क्षयरुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शिवडी रुग्णालयात विस्तारीकरण करण्यात आले आहे. याशिवाय याच रुग्णालयात राज्य क्षयरोग औषध भांडार निर्माण करण्यात आले असून मंगळवारी २६ नोव्हेंबर रोजी महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

Story img Loader