जिल्ह्य़ात वर्षभर विविध कार्यक्रम
स्वामी विवेकानंद यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त येत्या रविवारी (दि. १३) स्वामी विवेकानंद सार्ध शती समारंभ समितीच्या वतीने शहरात शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
समितीचे अध्यक्ष डी. डी. घोरपडे व कार्याध्यक्ष रमाकांत व्यास यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, समितीच्या वतीने येत्या वर्षभर जिल्ह्य़ात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याची सुरूवात या शोभायात्रेने होणार आहे. भाऊसाहेब फिरोदिया प्रशालेच्या प्रांगणातून शोभायात्रा निघणार आहे. शोभायात्रेत शहरातील विविध शाळा, सामाजिक संस्था, क्रीडा मंडळे, तरूण मंडळे सहभागी होणार आहेत. झांजपथक, वारकरी पथक, लेझीम पथके,
उंट, हत्ती आदी त्यात सहभागी
होतील.
फेब्रुवारीमध्ये सूर्यनमस्कार स्पर्धा, मार्च ते एप्रिलमध्ये घराघरात जाऊन विवेकानंदांच्या विचारांचा प्रसार, ऑगस्ट ते नोव्हेंबरमध्ये युवा, महिलांचे विविध कार्यक्रम, दि. ११ सप्टेंबरला भारत जागो दौड, नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात ग्रामीण भागात सात दिवसांचे सेवाकार्य व देशासाठी दोन वर्षे देणाऱ्या तरूणांसाठी कन्याकुमारी येथे तीन दिवसांचे शिबिर असे भरगच्च कार्यक्रम वर्षभर आयोजित करण्यात येणार आहेत.
स्वामी विवेकानंदांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीची सांगता पुढच्या वर्षी दि. १२ जानेवारीला देशभर मानवी साखळीने होणार आहे. या सर्व कार्यक्रमांसाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या सर्व कार्यक्रमांमध्ये मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन घोरपडे यांनी केले.