तुमच्या घरातील शोभेच्या झाडांच्या कुंडय़ांमध्ये अथवा प्लास्टिकच्या बादलीमध्ये पाणी साठलेले असेल तर सावधान. मलेरियापेक्षा घातक असलेला डेंग्यू तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळे घरात अथवा परिसरात पाणी साठणार नाही, याची काळजी घ्या. डेंग्यूचा धसका केवळ मुंबईतच नाही तर राज्यात आणि देशातही निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी एकटय़ा मुंबईत ४१६ जणांना डेंग्यूची लागण झाली होती तर यंदा ९०७ जणांना ही लागण झाली असून आतापर्यत सातजणांचे बळी गेले आहेत. राज्यातही आतापर्यंत ७३ जणांचे बळी गेले आहेत. दिवसा चावणाऱ्या या डासांपासून सावध राहण्याचा इशारा महापालिकेने तसेच वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. ताप आला तर दुर्लक्ष करू नका, असे पालिकेच्या एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगतले. रविवारी चार वर्षांच्या तसनीमच्या मृत्यूने मुंबईकर खडबडून जागे झाले आहेत. ५ डिसेंबर रोजी तिचे वडिल तारिक जाफरी यांचाही डेंग्यूनेच मृत्यू झाला होता. सध्या तिची आई शकिलावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बरेचवेळा ताप आला तरी क्रोसिन अथवा पॅरासिटामल घेऊन तापाकडे दुर्लक्ष केले जाते. डेंग्यूच्या डासाने चावा घेतला असेल तर परिस्थिती पाहाता पाहाता हाताबाहेर जाऊ शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
* आकडेवारी बघितली तर देशभरात डेंग्यूचे थैमान कसे वाढत चालले आहे हे लक्षात येईल. २०१० साली देशात २८,२९२ जणांना डेंग्यू झाला व ११० लोकांचा मृत्यू झाला. २०११साली १९ हजार लोकांना डेंग्यू झाला मात्र १६९ जणांचा डेंग्यूने बळी घेतला तर २०१२ साली यात प्रचंड वाढ होऊन ३७ हजार लोकांना डेंग्यूची लागण झाली आणि २२७ जणांचा बळी गेला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा