पनवेलच्या पाणीप्रश्नी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी पनवेल एसटी स्टॅण्ड येथील पाणी टाकी येथे मोर्चाचे आयोजन केले होते, परंतु पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे हे आंदोलन बारगळले. ‘शोले’ स्टाइल आंदोलनाचा पवित्रा घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या मनसेला निवेदन देण्याखेरीज व प्रशासकीय आश्वासनाखेरीज काहीच साधता आले नाही.
मनसेने आंदोलनाचा एक भाग म्हणून ‘धरण उशाशी आणि घशाला पडली कोरड’ अशी भित्तीपत्रे छापून शहरभर वाटली होती. मंगळवारी मनसेचे कार्यकर्ते पाण्याच्या टाकीकडे अनोखे आंदोलन करणार असल्याचे जाहीर झाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मनसेच्या या आंदोलनात सामान्य पनवेलकरांची हजेरी दिसत नव्हती. घोषणाबाजी सुरू झाल्यावर पोलिसांनी आंदोलकांना टाकीच्या प्रवेशद्वारावरच रोखले. पनवेल नगर परिषदेच्या अतिरिक्त मुख्याधिकारी चारुशीला पंडित यांनी येथे मनसेच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. उन्हाच्या चटक्यांमुळे चर्चा पंधरा मिनिटांतच आटपली. मनसेने या चर्चेवेळी सामान्य पनवेलकरांची व्यथा अतिरिक्त मुख्याधिकारी चारुशीला पंडित यांच्याकडे मांडली. मुनोत नगर, आदित्यविहार, रचना हाइट्स, लाइन आळीतील काही परिसर, पायोनियर सोसायटी, जनार्दन सहनिवास येथील रहिवाशांना पाणी मिळत नाही याकडे मनसेचे शीतल शिलकर व त्यांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा