ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबटय़ाला बेशुध्द करा, तसे जमत नसेल तर थेट गोळय़ा घालण्याचे आदेश वन्यजीव विभागाच्या मुख्य वनसंरक्षकांनी देताच पोलीस दलाचे दोन शार्प शुटर्स व बेशुध्दीकरणाचे इंजेक्शन देण्यासाठी वनखात्याचे दोन वनपरिक्षेत्र अधिकारी व दोन सहायक उपवनसंरक्षकाच्या नेतृत्वाखाली तीन पथके पायली व भटाळी परिसरात दाखल झाले आहे. गुरुवारी सायंकाळपासून शुटर्स बिबटय़ाचा शोध घेत जंगल पिंजून काढत आहेत.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील गावांमध्ये गेल्या २६ दिवसांपासून नरभक्षक बिबटय़ाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. काल गुरुवारी या बिबटय़ाने किटाळी येथील गोपिका नानाजी काळसर्पे या महिलेच्या नरडीचा घोट घेताच परिसरात तणावपूर्ण स्थिती आहे. संतप्त गावकऱ्यांनी वन कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यापासून तर जंगलाला आग लावणे, बिबटय़ाला घेरून ठेवणे, अधिकाऱ्यांना सलग चार तास घेराव करून ठेवल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. ही वस्तूस्थिती स्थानिक वनाधिकाऱ्यांनी वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक एस.डब्ल्यू.एच.नकवी यांना दिली. यानंतर वनखात्याच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक काल गुरुवारी रात्री झाली. यात स्थानिक अधिकाऱ्यांनी नरभक्षक बिबटय़ाला दिसता क्षणी गोळ्या घालण्याचा प्रस्ताव प्रधान मुख्य वनसंरक्षक नकवी यांच्याकडे सादर केला. याला नकवी यांनी हिरवी झेंडी देऊन बिबटय़ाला पहिले जेरबंद करण्याचे प्रयत्न करा, जेरबंद होत नसेल तर बेशुध्दीकरणाचे इंजेक्शन द्या आणि तेही झाले नाही तर थेट गोळय़ा घालण्याचे आदेश दिले.
असे आदेश मिळताच काल रात्रीपासून तीन पथके नरभक्षक बिबटय़ाचा शोध घेत जंगल फिंजून काढत आहेत. या तीन पथकात पोलीस कमांडो दलातील दोन शार्प शूटर्ससह बुशुध्दीकरणाचे इंजेक्शन देण्यासाठी ताडोबाचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदे व मोहुर्लीचे येले आहेत. सहायक उपवनसंरक्षक व सहायक उपवनसंरक्षक पवार यांच्या नेतृत्वाखालील एक पथक आहे. तीन पथकात प्रत्येकी पाच जणांचा समावेश असून यात डॉ.कडूकर, डॉ.वरठी, डॉ.सोनकर, डॉ.रामटेके या चार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. शार्प शूटर्सचे पथक पायली व भटाळी परिसरात शोध घेत आहेत. नरक्षभक बिबटय़ाने वन अधिकाऱ्यांच्या नाकात अक्षरश: दम आणलेला आहे. कारण, पायली, भटाळी व किटाळी या परिसरात चार पिंजरे लावण्यात आले आहेत.
बिबटय़ाला आमिष देण्यासाठी म्हणून या पिंजऱ्यात बोकड व बकरी बांधण्यात आलेली आहे. आज सकाळी बिबटय़ा पिंजऱ्याजवळ येऊन गेला मात्र पिंजऱ्यात आला नाही. लोकांना व शुटर्सला बघून तो जंगलात पसार झाला. आता एक शुटर उंच मचाणावर बसून बिबटय़ा दूरवर कुठे दिसतो का, हे बघत आहेत. २५ दिवसात आठ लोकांचे बळी घेतल्याने गावकरी भयभीत झाले असून त्यांनी घराबाहेर पडणे बंद केले आहे. किमान वृध्द व्यक्ती, महिला व बालकांनी काळजीपूर्वक घराबाहेर पडण्याचे आवाहन वनखात्याने दिले आहेत. सध्याची परिस्थिती लक्षात घेता बफर झोनअंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये वनखात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. या तीन पथकांसोबतच कडक पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला असून दंगा नियंत्रण पथकही लावण्यात आले आहे. वनखात्याने सर्व लक्ष केवळ नरभक्षक बिबटय़ावर केंद्रित केले असून गावकऱ्यांना किंवा परिसरातील लोकांना बिबट दिसताच वनाधिकाऱ्यांना माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहे.

तोच तो बिबटय़ा
सावली तालुक्यातील सादागड, पायली व भटाळी येथील नरभक्षक बिबटय़ा हा एकच असल्याचे काल गुरुवारी रात्री झालेल्या वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या बैठकीतून समोर आले. या बैठकीत सादागड व पायली येथील बिबटय़ांचे छायाचित्र एकत्र करून बघण्यात आले. यात दोन्ही बिबटय़ांची छायाचित्रे अतिशय मिळती जुळती असल्याचे बघून हा बिबट एकच असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. कारण, सादागड येथील नरभक्षक बिबटय़ाला ताडोबाच्या बफर झोनमध्ये सोडण्यात आले होते. आता तोच बिबट धुमाकूळ घालत आहे.

पिल्लाची प्रकृती चिंताजनक
नरभक्षक बिबटय़ाच्या धुमाकुळामुळे निफंद्रा येथे गावकऱ्यांनी जाळलेल्या व अतिशय चिंताजनक प्रकृती असलेल्या बिबटय़ाच्या पिल्लाकडे वनखात्याचे दुर्लक्ष झाले आहे. बिबटय़ाचे पिल्लू ३० ते ४० टक्के जळाल्याने त्याला वेदना होत आहेत. या पिल्लाला नागपूरला तातडीने हलविण्यात यावे, असे पत्र तपासणी करणाऱ्या तीन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने वनखात्याला दिले, मात्र ३६ तासांनंतरही त्याला नागपूरला हलविण्यात आलेले नव्हते. साठी प्रयत्न सुरू असल्याचे वनखात्याच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

Story img Loader