स्थानिक स्वराज्य संस्था कराला विरोध दर्शविण्यासाठी रविवारी शहरातील दुकाने बंद राहिली. उद्या सोमवारी खरेदीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा अक्षयतृतीयेचा मुहूर्त असला तरी त्यामध्ये सर्व प्रकारच्या व्यापाऱ्यांनी सहभागी होण्याचे निश्चित केले आहे. सराफ, धान्य, भांडी व इलेक्ट्रॉनिक साहित्य या वस्तूंच्या संघटनाही उद्याच्या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. व्यापाऱ्यांचा हा पवित्रा पाहता ग्राहकांना शुभ मुहूर्तावरच्या खरेदीला मुकावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान रविवारी व्यापारी महासंघाच्या वतीने शहरात पदयात्रा काढून छोटय़ा विक्रेत्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. एलबीटी कराच्या विरोधात कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी बेमुदत बंदचे आयोजन केले आहे. साधारणत: रविवारी बरेचशे दुकानदार दुकाने बंद ठेवतात. तर आजचा बंद लक्षात घेऊन बहुतांशी विक्रेत्यांनी आपल्या दुकानांना शटर लावले होते. सकाळी महालक्ष्मी मंदिरामध्ये सुमारे ४०० व्यापारी जमले होते. तेथे महाआरती करण्यात आली. येथून व्यापारी भवानी मंडपात आले. व्यापाऱ्यांच्या पदयात्रेस तेथूनच सुरुवात झाली. लक्ष्मीपुरी, महाव्दार रोड, पापाची तिकटी, महापालिका आदी भागांमध्ये ही फेरी निघाली. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर यांनी बंदमध्ये सहभागी नसलेल्या छोटय़ा विक्रेत्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे हात जोडून आवाहन केले.    
उद्या सोमवारी अक्षयतृतीया असल्याने खरेदीच्या दृष्टीने काही व्यापाऱ्यांचा हा महत्त्वपूर्ण दिवस होता. याबाबत इंजिनिअरिंग असोसिएशनच्या कार्यालयात धान्य विक्रेते असलेल्या ग्रेन मर्चंट असोसिएशन, सोन्या-चांदीची विक्री करणाऱ्या सराफ असोसिएशन, इलेक्ट्रॉनिक साहित्याची विक्री करणारे इलेक्ट्रॉनिक असोसिएशन आणि भांडी विक्रेता असोसिएशन यांची बैठक झाली. त्यांनी अक्षयतृतीयेचा सण असला तरी बंदमध्ये सहभागी होण्याचा ठाम निर्णय घेतला. अशाच प्रकारचा निर्णय मुंबई, पुणे येथील व्यापाऱ्यांनीही घेतला असल्याचे कोरगावकर यांनी सांगितले. दरम्यान गांधीनगर येथे उद्या सोमवारी बंद पाळण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. गांधीनगरमध्ये एलबीटी कर लागू नसला तरी व्यापाऱ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.

Story img Loader