सध्या जमाना फ्री गिफ्टस्चा आहे. बांधकाम व्यवसायही त्यास अपवाद नाही. त्यामुळे दूरवरच्या उपनगरांत कनिष्ठ मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडणाऱ्या किमतीत घर देताना त्यासोबत दुचाकी मोफत देण्याच्या योजना बिल्डर राबविताना दिसतात. कारण स्वत:ची दुचाकी असल्याशिवाय रेल्वे स्थानकापासून किमान पाच ते सात किलोमीटर अंतरावरील घर गाठणे उपनगरातल्या नागरिकांना अशक्यच असते. ठाणे जिल्ह्य़ात नवी मुंबई, ठाणे तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्वत:च्या परिवहनसेवा आहेत. उल्हासनगरमध्ये खासगीकरणातून परिवहनसेवा सुरू आहे. मात्र ज्या वेगाने या शहरांचा परिघ आणि लोकसंख्या वाढतेय, त्या तुलनेत  या परिवहनसेवा अत्यंत अपुऱ्या आहेत. अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा या आता वेगाने वाढणाऱ्या शहरांना त्यांची अशी स्वतंत्र परिवहनसेवाच नाही. त्यात गेल्या १५ वर्षांपासून रिक्षांना परवाने देणे थांबविण्यात आले असले तरी लोकसंख्या मात्र वाढतच आहे.  ठाणे परिसरातील शहरे तर साधारणपणे दहा वर्षांत दुप्पट होत आहेत. परिणामी अपुऱ्या रिक्षांची शिक्षा प्रवाशांना सोसावी लागते. त्यामुळे घर ते रेल्वेस्थानक हा प्रवास वेळेत निर्धोक होण्यासाठी नागरिकांपुढे दुचाकी हाच एक पर्याय ठरतो. अशा प्रकारे अपुऱ्या परिवहनसेवेमुळे शहरांमध्ये पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे.
जवळच्या उपनगरांत पायी जाता येईल, इतक्या अंतरावर घर विकत घेणे आता मध्यमवर्गाच्या आवाक्यात राहिलेले नाही. मुंबईलगत असणाऱ्या ठाणे शहराने तर आता थेट भाईंदर पाडय़ाची वेस गाठली आहे. रेल्वे स्थानकापासून हे अंतर साधारण दहा किलोमीटर इतके आहे. कल्याण, डोंबिवलीतही तशीच स्थिती आहे. देसाई गावापर्यंत डोंबिवली तर गांधारी पुलापर्यंत कल्याण विस्तारले आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांचाही परिघ अतिशय वेगाने विस्तारू लागला आहे.
ठाणे, कल्याण-डोंबिवलीत अपुरी का होईना पण महापालिकेची परिवहनसेवा आहे. अंबरनाथ, बदलापूरमध्ये मात्र परिवहनसेवाच नाही. मध्यंतरी तेथील नगरपालिकांनी उल्हासनगरमधील खासगी परिवहनसेवा अंबरनाथमध्ये राबविण्याचा प्रयत्न केला, पण तेथील रिक्षाचालकांनी तो हाणून पाडला. या दोन्ही शहरांमधील रिक्षाचालक मीटरप्रमाणे भाडे आकारीत नाहीत. शिवाय पैसे मोजूनही रिक्षा वेळेवर उपलब्ध असण्याची शक्यता नसते. त्यामुळे या मन:स्तापापासून वाचण्यासाठी येथील नागरिक स्वत:चे वाहन वापरतात. मात्र स्थानक परिसरात वाहने ठेवण्यासाठी  फारशी जागाच उपलब्ध नाही. अंबरनाथमध्ये तर रेल्वे स्थानकाजवळील शिवाजी उद्यान या मैदानाचा पार्किंग प्रकल्पासाठी बळी देण्यात आला आहे. कारण वाढत्या संख्येने शहराच्या चोहोबाजूंनी स्थानकांकडे येणाऱ्या दुचाकी तसेच चारचाकी गाडय़ा पार्क करण्यासाठी  पुरेशी जागाच नाही. बदलापूरमध्येही फारसे वेगळे चित्र नाही.

Story img Loader