टंचाई स्थितीत समन्वयाने काम करावे- क्षीरसागर
जिल्ह्य़ातील टंचाई स्थितीला सामोरे जाण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या सहकार्याबरोबरच जिल्हा परिषद व महसूल प्रशासनाने समन्वयाने काम करावे. तसेच मंजूर कामे सुरळीत व विनाविलंब सुरू करावीत, अशा सूचना पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन भवनाच्या सभागृहात आष्टी व पाटोदा तालुका टंचाई आढावा बैठक पालकमंत्री क्षीरसागर यांच्या उपस्थितीत झाली. आमदार सुरेश धस, जि. प. अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला, माजी आमदार साहेबराव दरेकर, भीमराव धोंडे, जिल्हाधिकारी एस. टी. टाकसाळे, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे आदी उपस्थित होते. क्षीरसागर म्हणाले की, गहू, हरभरा या पिकांसाठी १५ जानेवारीपर्यंत पीकविमा भरण्यास शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली. बँक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा पीकविमा तत्काळ भरावा. जनतेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. हा प्रश्न सोडविण्यास पिण्याच्या पाण्याचा टँकरचा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी गटविकास अधिकारी व तहसील यांनी संयुक्त पाहणी करून या प्रस्तावास तत्काळ मंजुरी द्यावी. आवश्यक त्या ठिकाणी विंधन विहिरींनाही प्राधान्य द्यावे. सद्यस्थितीला आष्टी तालुक्यात ८६, तर पाटोदा तालुक्यात १० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मागणीप्रमाणे टँकर वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पाण्याच्या स्रोतांच्या ठिकाणी १२ तास सुरळीत वीजपुरवठा राहील, या साठी महावितरणने दक्षता घ्यावी व रात्रीचे भारनियमन न करता सिंगलफेज सुविधा उपलब्ध करावी. तसेच ५० टक्क्य़ांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या ६८५ गावांमधील वीज देयकांचा भरणा करण्यास शासन निर्णयानुसार ग्राहकांना लाभ देण्यात यावा. पाणीपुरवठा विभागातील रिक्त जागा तत्काळ भरण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्य़ातील पशुधन जगविण्यासाठी चारा व पशुखाद्य उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी सरकारने ठरवून दिलेल्या निकषांचा अवलंब करावा. मागणी व आवश्यकतेनुसार जनावरांच्या छावण्या सुरू कराव्यात. सद्यस्थितीत आष्टी तालुक्यात १४ छावण्या सुरू असून यात मोठय़ा प्रमाणात जनावरे आहेत. पाटोदा व आष्टी तालुक्यांतून जास्तीच्या जनावरांच्या छावण्यांची मागणी झाल्यास छावण्या सुरू करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभागांद्वारे रोजगार हमी योजनेची कामे हाती घेण्यात यावीत. तसेच तलावातील गाळ काढण्याच्या कामांना परवानगी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader