रेल्वे स्थानक परिसरातील गंभीर गुन्ह्य़ाची उकल होण्यासाठी सीसी टीव्हींचे चित्रीकरण महत्त्वाचे ठरत असूनही कल्याणपल्याडच्या स्थानके या सोयींपासून वंचित आहेत. शहाड, आंबिवली, टिटवाळा, आसनगाव, कसारापर्यंत तर विठ्ठलवाडी, उल्हासनगर, कर्जत आणि खोपोलीपर्यंत वीसहून अधिक स्थानकांमध्ये सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचा पत्ताच नाही. या भागांमध्ये उशिरा धावणाऱ्या लोकलसेवेमुळे अनेक वेळा प्रवासी आक्रमक होऊन कर्मचाऱ्यांना घेराव घालून मारहाणीचे प्रकारसुद्धा घडतात. अशा वेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे असे दंगलखोर प्रवासी पकडले जाऊ शकतात. मात्र या भागातील स्थानकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने अशा दंगलखोर प्रवाशांना आळा बसवणे पोलीस प्रशासनाला अवघड बनले आहे.
आसनगाव स्थानक..सकाळी सव्वा नऊची वेळ.. मुंबईकडे जाणारी लोकल उशिरा धावणार..संतप्त प्रवाशांचा स्टेशन मॅनेजर दालनात प्रवेश. तिथे ठिय्या आंदोलन करीत सरकारी कामात अडथळा..यामुळे नाशिकच्या दिशेने येणाऱ्या-जाणाऱ्या मेल गाडय़ा खोळंबल्या. लांब पल्ल्याच्या प्रवाशांना याचा मोठा फटका सहन करावा लागला. असे प्रसंग कल्याणपलीकडच्या स्थानकांमध्ये वारंवार घडत असतात. कधी आसनगाव तर कधी कसारा या स्थानकांमध्ये हे प्रकार नेहमी घडतात.
त्यामुळे उपनगरीय रेल्वे गाडय़ांच्या वेळापत्रकावर याचा रोजच ताण येतो. असे असताना असा दंगलखोर प्रवाशांना शोधून त्यांना अटकाव करण्यासाठी प्रवाशांच्या कैकपट कमी संख्येने असलेल्या रेल्वे पोलिसांची मोठी तारांबळ उडते. अशा वेळी या स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज उपयुक्त ठरू शकतील, असे वाटत असले तरी या स्थानकांमध्ये सीसीटीव्हीच नाहीत.
जानेवारी २०१३ मध्ये आसनगावमध्ये रेल्वे स्टेशन व्यवस्थापकांवर संतप्त प्रवाशांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात आठ जणांना अटक करून त्यांना शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यावेळी रेल्वे प्रवासी संघटनांनी येथील स्थानकांवर सीसीटीव्ही बसवण्याचा आग्रह धरला होता.
अपुरे पोलीस असल्याने या भागामध्ये सुरक्षेची पुरेशी यंत्रणाच कार्यान्वित नाही. त्यामुळे किमान सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने तरी गुन्हेगारांना शोधणे शक्य होईल. त्यामुळे प्रवासी संघटना याबाबतीत आग्रही आहेत. कल्याण पुढच्या स्थानकातील सुरक्षा रामभरोसे अशीच आहे. दंगलखोर प्रवाशांचा उपद्रव वाढला असून अपुऱ्या पोलीस यंत्रणेमुळे त्याच्यावर नियंत्रण राखणे अशक्य होत चालले आहे. या दंगलखोरांना आवरण्यासाठी सुरक्षा यंत्रणेमध्ये वाढ करा, अशी मागणी उपनगरीय एकता संस्थेचे उपाध्यक्ष आदेश घनघाव यांनी केली आहे.
अतिमहत्त्वाच्या स्थानकांमध्येच सीसीटीव्ही
इंटिग्रेटेड सिक्युरीटी सिस्टिम्समध्ये मुंबई ठाण्यातील अतिमहत्त्वाच्या स्थानकांचा समावेश असून सध्या त्यांनाच सीसीटीव्हीचे कवच पुरवण्यात आले आहे. सध्या ‘ए’ क्लास स्थानक असलेल्या सहा स्टेशन्सवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून भविष्यात बी, सी क्लास स्थानकातसुद्धा सीसीटीव्ही बसवले जातील. मात्र त्यासाठी वेळ लागणार आहे, अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा