डेंग्यू, मलेरियासह आदी रोगांच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (मेडिकल) मात्र औषध वितरित केली जात नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना औषधांसाठी फिरावे लागत आहे. शिवाय स्थानिक आणि काही बाहेरील औषध कंपन्यांची देयके प्रलंबित असल्याने त्यांनी रुग्णालयातील औषध पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे बीपीएल रुग्णांची फारच गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे.
शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (बीपीएल) दारिद्रय़ रेषेखाली असलेल्या रुग्णांसाठी औषधी नसल्यास स्थानिक पातळीवर रुग्णालयाला (लोकल पर्चेस) औषधी खरेदी  करण्याचा अधिकार देण्यात आला असून अधिष्ठात्यांना त्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक औषध विक्रेत्यांची लाखो रुपयाची देयके मेडिकल आणि मेयो प्रशासनाने दिली नसल्यामुळे त्यांनी औषध पुरवठा देणे बंद केल्याची माहिती मिळाली. दारिद्रय़ रेषेखाली येणाऱ्या रुग्णांसाठी अधिष्ठात्याच्या अधिकारक्षेत्रात स्थानिक औषध पुरवठादारांकडून औषधी खरेदी करण्याचा अधिकार देण्यात आला आहे मात्र, सध्या काही स्थानिक औषध विक्रेत्यांनी औषध पुरवठा करणे बंद केले आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात रुग्णांची गैरसोय असल्याचे दिसून येत आहे.
अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधे खरेदी करून घेऊन या, असे रुग्णालयातून सांगितले जात आहे. विविध कंपन्याची देयके देण्याबाबतचा प्रस्ताव मेडिकल प्रशासनाने राज्य सरकारच्या वैद्यकीय विभागाकडे पाठविला आहे मात्र, त्याला अजूनपर्यंत मंजुरी मिळाली नाही. मेडिकलमध्ये ग्रामीण भागातील अनेक गोरगरीब रुग्ण येत असतात. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे महाग असतात त्यामुळे सामान्य नागरिक ती खरेदी करून शकत नाही. शिवाय दारिद्रय़ रेषेखाली असलेल्या रुग्णांना रुग्णालयातून मोफत औषधी दिली जातात मात्र, ती त्यांना मिळत नाही अशी तक्रार अनेक बीपीएलधारकांनी केली आहे. मेडिकलमध्ये औषधी नसल्यास दारिद्रय़रेषेखाली येणाऱ्या रुग्णांसाठी स्थानिक पातळीवर औषधी खरेदी केली जात नाही. त्यामुळे अनेक रुग्णांची आर्थिक स्थिती नसतांना त्यांना बाहेरून औषधी खरेदी करावी लागतात. पाच महिन्यापूर्वी वैद्यकीय मंत्री डॉ. विजयकुमार गावित नागपुरात आले असता त्यांनी सर्व औषध कंपन्याची देयके देण्यात आल्याचे सांगितले होते. मेडिकल आणि मेयो रुग्णालयात बीपीएल रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करावी लागणार नाही. रुग्णालयातून त्यांना औषधे दिली जातील, असे आश्वासन दिले होते मात्र रुग्णालयातील स्थिती प्रत्यक्षात विसंगत आहे. या संदर्भात मेडिकलच्या औषध विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, डेंग्यू आणि मलेरियासह साथीच्या रोगासाठी पुरेसा औषधी साठा उपलब्ध असला तरी  डेग्यूंच्या आजारावरील काही औषधी मात्र रुग्णालयात उपलब्ध नसल्यामुळे ती रुग्णांना बाहेरून खरेदी करावी लागतात. स्थानिक औषध विक्रेत्यांची देयक वैद्यकीय संचालनालयाकडे पाठविल्यानंतर त्यांचा पैसा येतो. स्थानिक पातळीवर औषधी खरेदी करण्याचा अधिकारी  मेडिकल प्रशासनाला असला पैसा मात्र, शासनाकडून येतो आणि तो मात्र वेळेवर मिळत नसल्यामुळे अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले.

Story img Loader