टिटवाळा परिसरातील ६४ गावांतील ग्रामस्थांना माफक दरात रुग्ण सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने टिटवाळ्यात क्रिएटिव्ह ग्रुपतर्फे उभारण्यात आलेल्या श्रीमहागणपती रुग्णालय तज्ज्ञ डॉक्टरांच्या शोधात आहे. सेवाभावी उद्देशातून गेल्या तीन ते चार वर्षांपासून सुरू असलेल्या या रुग्णालयातील सुविधांचा हजारो रुग्णांनी लाभ घेतला आहे.शहापूर, मुरबाड, टिटवाळा परिसरातील रुग्णांची प्रकृती बिघडली की त्याला ठाणे, मुंबई, कल्याण येथे धाव घ्यावी लागत होती. रुग्णांना तात्काळ आपल्या घराजवळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशातून क्रिएटिव्ह ग्रुपचे विक्रांत बापट, प्रमोद दलाल तसेच इतर काही मंडळींच्या सहकार्यातून टिटवाळ्यात श्रीमहागणपती रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. या रुग्णालयात ग्रामीण, आदिवासी भागांतील तसेच वृद्धाश्रम, सेवाभावी संस्थांमधील रुग्ण मोठय़ा संख्येने उपचार घेत असल्याने मुंबई परिसरातील अनेक दानशूर, काही कापरेरेट कंपन्यांनी रुग्णालयाला विविध प्रकारची वैद्यकीय सुविधा मोफत उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत विविध प्रकारच्या सुमारे सोळा हजारांहून अधिक रुग्णांनी रुग्णालयातील सेवेचा लाभ घेतला आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय विमा योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रुग्णालयात एम.बी.बी.एस. डॉक्टर कार्यरत आहेत. शहरापासून दूर, दुर्गम भाग म्हणून टिटवाळाकडे अजूनही पाहिले जात असल्याने रुग्णालयात विशेष शाखांचे तज्ज्ञ डॉक्टर टिकत नाहीत. थोडे दिवस सेवा दिल्यानंतर अनेक कारणे देऊन ही तज्ज्ञ मंडळी निघून जातात. त्याचा परिणाम रुग्ण सेवेवर होतो, असे रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बापट यांनी सांगितले. टिटवाळा परिसराचे झपाटय़ाने नागरीकरण होत आहे. अन्य विकासाबरोबर रुग्ण सेवा हाही या भागाचा मुख्य घटक आहे. त्यामुळे या भागात सेवा देऊ इच्छिणाऱ्या काही तज्ज्ञ डॉक्टरांनी आपल्या सेवेचा काही वेळ श्रीमहागणपती रुग्णालयासाठी दिला तर गोरगरीब रुग्णांना त्याचा अधिक लाभ होईल, असे बापट यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा