३० तास विजेचा लपंडाव सुरू
– विटावा परिसरातही वीज नाही
– नागरिकांमध्ये नाराजी ल्ल लोकप्रतिनिधी हतबल
एकीकडे कडक उन्हाळा, तर दुसरीकडे भारनियमन अशा दुहेरी त्रासामुळे हैराण झालेले कळवा, मुंब्रा परिसरातील रहिवाशी पावसाच्या आगमनाकडे डोळे लावून बसले होते. पावसाळा सुरू होताच भारनियमनाचे चटके कमी होतात, हा दरवर्षीचा अनुभव असल्यामुळे मुंब््रयातील रहिवाशी तर चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत होते. झाले मात्र उलटेच. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका कळवा, मुंब्रा, खारेगाव, विटावा या परिसरातील रहिवाशांना बसू लागला असून मागील ७२ तासांमध्ये तब्बल ३० तासांपेक्षा अधिक काळ या परिसरातील विजेचा पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिक अक्षरश: त्रासून गेले आहेत. विशेष म्हणजे, वारंवार वीजपुरवठा खंडित होऊनही वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्यामुळे नागरिक कमालीचे संतापले असून या भागातील लोकप्रतिनिधींचेही या मुजोर अधिकाऱ्यांपुढे काही चालेनासे झाले आहे.
ठाणे महापालिकेच्या वेगवेगळ्या विकासकामांचा शुभारंभ करण्यासाठी काही दिवसांपूर्वी कळवा-मुंब्रा परिसराच्या दौऱ्यासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या भागातील विजेचा पुरवठा अधिक सक्षम करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या होत्या. मुंब््रयावर अन्याय करणे योग्य होणार नाही. त्यामुळे मुंब््रयातील भारनियमन कमी करण्यासंबंधी सकारात्मक विचार करा, असा सल्लाही पवार यांनी दिला होता. पवारांच्या या दौऱ्यामुळे कळवा, मुंब््राावासीयांच्या पदरात काही ठोस पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात पाऊस सुरू होताच वारंवार खंडित होणाऱ्या विजेच्या पुरवठय़ामुळे स्थानिक रहिवाशी हैराण झाले असून स्थानिक राजकीय नेत्यांविरोधात खडे फोडू लागले आहेत.
तकलादू कारणे.. वीज मात्र गायब
पावसाळा सुरू होण्यापूर्वी देखभाल, दुरुस्तीच्या नावाखाली कळवा, खारेगाव परिसरातील विजेचा पुरवठा वारंवार खंडित होत असे. हे चित्र पुढे बदलेल, अशी आशा कळवावासी बाळगून होते. प्रत्यक्षात चित्र उलटे दिसू लागल्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. शनिवारपासून कळवा, खारेगाव, विटावा या परिसराचा वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. शनिवारी रात्री खारेगाव परिसरातील एक अशोक वृक्ष वीजवाहिनीवर कोसळल्यामुळे या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढू लागले असून टप्प्याटप्प्याने खारेगाव, विटावा भागातील वीज खंडित होत असल्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. शनिवारी दिवसभर वीज खंडित झाल्यानंतर रविवारी दुपारपासून या सर्व परिसराचा वीजपुरवठा खंडित होता.
सायंकाळी सहाच्या सुमारास विटावा तसेच कळवा परिसरात काही ठिकाणी वीजपुरवठा पूर्ववत करण्यात कंपनीच्या अधिकाऱ्यांना यश मिळाले. रात्री पुन्हा वीज खंडित झाल्यामुळे कळवेकरांना रात्र अंधारात काढावी लागली. सोमवारी दिवसभर विजेचा लपंडाव सुरूच होता, अशी माहिती विटावा परिसरातील रहिवासी शशिकांत भोसले यांनी वृत्तान्तला दिली. दरवर्षीच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला वीजपुरवठय़ाची अशीच परिस्थिती असते, असेही भोसले यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकांचा कायापालट घडवून आणणाऱ्या आमदार महाशयांनी कळव्यातील डळमळीत वीजपुरवठय़ाविषयी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा खारेगाव येथील अमृतांगण वसाहतीमधील रहिवासी अम्मा जोशी यांनी व्यक्त केली. कळव्यातील विजेचे दुखणे कायम असून ठाण्यात २४ तास वीजपुरवठा करण्यासाठी धडपडणारे वीज मंडळाचे अधिकारी कळव्यात झोपा काढतात काय, असा सवाल येथील रहिवाशी उपस्थित करीत आहेत.
कळवा, मुंब्रा, खारेगाव परिसरात मुसळधार पावसामुळे काही दुर्घटना घडल्या. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटना घडल्याची कबुली या भागातील अधीक्षक अभियंता वाडेकर यांनी दिली. वीजपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी वीज कंपनीचे अधिकारी अविरत मेहनत घेत आहेत, असा दावाही त्यांनी केला.