३० तास विजेचा लपंडाव सुरू
– विटावा परिसरातही वीज नाही
– नागरिकांमध्ये नाराजी ल्ल लोकप्रतिनिधी हतबल
एकीकडे कडक उन्हाळा, तर दुसरीकडे भारनियमन अशा दुहेरी त्रासामुळे हैराण झालेले कळवा, मुंब्रा परिसरातील रहिवाशी पावसाच्या आगमनाकडे डोळे लावून बसले होते. पावसाळा सुरू होताच भारनियमनाचे चटके कमी होतात, हा दरवर्षीचा अनुभव असल्यामुळे मुंब््रयातील रहिवाशी तर चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत होते. झाले मात्र उलटेच. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका कळवा, मुंब्रा, खारेगाव, विटावा या परिसरातील रहिवाशांना बसू लागला असून मागील ७२ तासांमध्ये तब्बल ३० तासांपेक्षा अधिक काळ या परिसरातील विजेचा पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिक अक्षरश: त्रासून गेले आहेत. विशेष म्हणजे, वारंवार वीजपुरवठा खंडित होऊनही वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्यामुळे नागरिक कमालीचे संतापले असून या भागातील लोकप्रतिनिधींचेही या मुजोर अधिकाऱ्यांपुढे काही चालेनासे झाले आहे.
ठाणे महापालिकेच्या वेगवेगळ्या विकासकामांचा शुभारंभ करण्यासाठी काही दिवसांपूर्वी कळवा-मुंब्रा परिसराच्या दौऱ्यासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या भागातील विजेचा पुरवठा अधिक सक्षम करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या होत्या. मुंब््रयावर अन्याय करणे योग्य होणार नाही. त्यामुळे मुंब््रयातील भारनियमन कमी करण्यासंबंधी सकारात्मक विचार करा, असा सल्लाही पवार यांनी दिला होता. पवारांच्या या दौऱ्यामुळे कळवा, मुंब््राावासीयांच्या पदरात काही ठोस पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात पाऊस सुरू होताच वारंवार खंडित होणाऱ्या विजेच्या पुरवठय़ामुळे स्थानिक रहिवाशी हैराण झाले असून स्थानिक राजकीय नेत्यांविरोधात खडे फोडू लागले आहेत.
तकलादू कारणे.. वीज मात्र गायब
पावसाळा सुरू होण्यापूर्वी देखभाल, दुरुस्तीच्या नावाखाली कळवा, खारेगाव परिसरातील विजेचा पुरवठा वारंवार खंडित होत असे. हे चित्र पुढे बदलेल, अशी आशा कळवावासी बाळगून होते. प्रत्यक्षात चित्र उलटे दिसू लागल्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. शनिवारपासून कळवा, खारेगाव, विटावा या परिसराचा वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. शनिवारी रात्री खारेगाव परिसरातील एक अशोक वृक्ष वीजवाहिनीवर कोसळल्यामुळे या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढू लागले असून टप्प्याटप्प्याने खारेगाव, विटावा भागातील वीज खंडित होत असल्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. शनिवारी दिवसभर वीज खंडित झाल्यानंतर रविवारी दुपारपासून या सर्व परिसराचा वीजपुरवठा खंडित होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा