उन्हाळा आला की आंब्याच्या रसाची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. पिकलेले आंबे बाजारात आले की त्याच्या घमघमाटाने जिभेला पाणी सुटले नाही तर नवलच. मात्र, यंदा आंब्याच्या रसावर ताव मारणाऱ्यांना यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. विदर्भात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठय़ा प्रमाणात आंब्याचे नुकसान झाले असून देशाच्या इतर भागातून येणाऱ्या आंब्यांची आवकही कमी झाल्याने यंदा आंबा महागणार आहे. सोबतच साखरेचे दरही वाढल्याने रसाचा गोडवाही कमी होणार आहे.
शाळेला उन्हाळ्याच्या सुटय़ा लागल्या की विद्यार्थ्यांना ओढ असते ती आजोळी जाण्याची. मामाच्या गावी जाऊन मौज करण्याचा आनंद वेगळाच. पूर्वी उन्हाळ्यात माहेरी आलेल्या मुलींसाठी आंब्याच्या रसाचा पाहुणचार हमखास ठरलेला असायचा. काळ बदलला, फास्ट फूडच्या जमाण्यात सर्वाची धाव ही तयार जिनसांकडे असल्याने आंब्यांच्या रसाची गोडी काहीशी कमी झाली आहे. वाढते शहरीकरण, तर खेडी ओस पडत चालली आहेत. त्यामुळे खेडय़ात आजोळी जाण्यात पूर्वी असणारी मजा आता कालबाह्य़ झाली.
शहरात विविध कंपन्यांचे आंब्याच्या रसाचे  ‘टेट्रा पॅक’ उपलब्ध आहेत, असे असले तरी घरी केलेल्या रसाची चव काही वेगळीच. यंदा मात्र अशा शौकिनांना त्यांच्या जिभेचा लाड पुरवण्यासाठी अधिक पैसै मोजावे लागणार आहेत. दोन महिन्यापूर्वी विदर्भात अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ  बुलढाणा, भंडारा, गोंदिया आणि नागपूर या भागात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे मोठय़ा प्रमाणात आंब्याचा मोहर गळला, काही ठिकाणी तर झाडाला लागलेल्या कैऱ्याही पडल्यामुले मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे आंब्याचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटले आहे. ज्या भागात तो शिल्लक आहे त्याची प्रत खराब झाली आहे. त्यामुळे यावेळी बाजारात कच्च्या आंब्याची आवक कमी होण्याची शक्यता आहे.
सध्या संत्री आणि द्राक्षाचा हंगाम जोरात आहे. हा ओसरायला लागल्यावर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापासून आंबे बाजारात यायला सुरुवात होते. सरासरी  ५०० ते ७०० रुपये प्रति ४० किलो या प्रमाणे कच्च्या आंब्यांचे सध्या दर असून आवक कमी झाल्यावर हे दर १००० ते १२०० रुपयापयर्ंत जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. नागपुरात गावरानी आंब्यांची व्यापारपेठ आहे. संपूर्ण विदर्भातून प्रथम नागपूर येथे आंबा येतो व तेथून आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि देशाच्या इतर राज्यात तो जातो, गावरानी आंब्याची मागणी लोणच्यासाठी अधिक असते. यंदा मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होणार असल्याने दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. गावरानी आंब्याची ही स्थिती असताना आंध्रप्रदेशातूनत येणारे बैगनफल्ली, तोताफल्ली आणि निलम आंब्यांची आवकही गेल्या काही वर्षांंपासून कमी होत आहे. या भागात सुरू असलेली आंदोलन आणि नैसर्गिक संकटांचा आंब्याला फटका बसला आहे. रसाचे आंबेही महागणार आहेत. साखरेचे दर पूर्वीच चढलेले असल्याने रस खाणाऱ्या शौकिनांना आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

Story img Loader