नाशिक कृषी विभागात नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव या चार जिल्ह्य़ांचा समावेश असून २०१३ च्या सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेले अधिक पर्जन्यमान व आर्द्रतेमुळे सोयाबीनचे उत्पादन व गुणवत्तेवर परिणाम झाला असल्याने २०१४ च्या खरीप हंगामात सोयाबीन बियाणाची कमतरता भासणार असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.
विभागात सोयाबीन पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र ७४०२५ हेक्टर आहे. २०१२-१३ मध्ये ९२१०० हेक्टर, २०१३-१४ मध्ये १२०३०० हेक्टरवर पेरणी झाली असून २०१४-१५ च्या खरीप हंगामात १३४००० हेक्टवर पेरणी प्रस्तावित आहे. सोयाबीन पिकाखालील क्षेत्रात वाढ होणार असल्याने अधिक बियाणाची गरज भासणार असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.
सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पीक असून केंद्र शासनाच्या सुचनांनुसार त्यामध्ये बियाणे बदलाचे प्रमाण ६५ टक्क्यांपर्यंत असणे आवश्यक आहे. सरळ वाणांचे प्रत्येक वर्षी नवीन बियाणे घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ होते. पर्यायाने त्याला आर्थिक लाभ कमी होतो. सोयाबीन बियाणांमध्ये सर्वच वाण हे सरळ वाण आहेत. त्यामुळे अशा वाणांचे बियाणे प्रत्येक वर्षी बदलणे आवश्यक नसते. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्यांच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील दोन ते तीन वर्षांपर्यंत वापरता येते. सोयाबीन बियाणे पेरणीपूर्वी बियाणांची उगवणक्षमता चाचणी फार गरजेची आहे. त्यावरून चांगल्या उगवण क्षमतेची खात्री पटू शकते. सोयाबीन बियाणाची पेरणी करतेवेळी बियाणाचे प्रमाण किती ठेवावे याबद्दल अंदाजही येऊ शकतो. ही पद्धत सोपी असल्यामुळे घरच्या घरीही चाचणी करता येते.
या चाचणीसाठी शेतकऱ्यांनी स्वत:कडे असलेल्या सोयाबीन बियाणातील काडीकचरा, खडे, लहान फुटलेले बियाणे वेगले करावे. चाळणीनंतर स्वच्छ झालेले एका आकाराचे बियाणे चाचणीसाठी निवडावे.
सोयाबीन बियाणाची उगवण क्षमता चांगली म्हणजेच ७० ते ७५ टक्के असेल तर शिफारस केलेल्या मात्रेनुसार प्रति हेक्टर ७५ किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे. जर उगवण क्षमता कमी असेल तर त्याच्या प्रमाणात अधिकच बियाणे पेरणीसाठी वापरावे असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shortage of soybean seeds in nashik