उसाची कमतरता असल्याने जिल्हय़ातील साखर कारखाने अडचणीत सापडले आहेत. दुसरीकडे ऊस पळवून खासगी कारखाने सहकारी साखर कारखान्यावर मुजोरी करीत असल्याचा आरोप राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आमदार जयप्रकाश दांडेगावकर यांनी केला.
जिल्हय़ात ३ साखर कारखाने असून त्यांच्या गळितास सुरुवात झाली आहे. या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने उसाचे क्षेत्र घटले. चालू हंगामाविषयी दांडेगावकर यांनी संगितले, की या वर्षी पाऊस कमी झाल्याने उसाची वाढ खुंटली. उसाचे क्षेत्र कमी झाले. १६० दिवस चालणारा गळीत हंगाम फार तर १०० दिवस चालेल. पुढील वर्ष साखर कारखान्यांसाठी अत्यंत कठीण आहे. पूर्णा व बाराशिवला किमान ८ लाख टन उसाची गरज आहे. या वर्षी ५ लाख टन ऊस कमी असल्याने उसाची तूट वाढली आहे. पूर्णा, बाराशिवच्या कार्यक्षेत्रातील ऊस त्रिधारा व गंगाखेडचे खासगी कारखाने पळवत असून त्यांची सहकारी कारखान्यांवर मुजोरी चालू असल्याचा आरोप त्यांनी केला. या क्षेत्रातील ऊस घेण्यास त्यांना बंदी घालावी, अशी तक्रार सरकारकडे केली असल्याचे दांडेगावकर यांनी निदर्शनास आणले.
जिल्हय़ातील सर्वात जुना व मराठवाडय़ात सर्वप्रथम उभारलेला मराठवाडा डोंगरकडा सहकारी साखर कारखाना बंद पडला होता. हा कारखाना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी चालवायला घेतला. तो भाऊराव चव्हाण यांच्या नावाने चालू असून, त्याचे गळीतही नुकतेच सुरू झाले. या कारखान्याच्या क्षेत्रातही उसाचे प्रमाण कमी झाल्याने हा कारखानाही १०० दिवसांआधीच गाळप बंद करेल, असे चित्र आहे. भाऊराव चव्हाण युनिट दोनअंतर्गत कार्यक्षेत्रात हिंगोली व नांदेड जिल्हय़ांतील ३५ गावे येतात. कारखान्याची प्रतिदिन गाळपक्षमता १२०० मेट्रिक टन असून, गतवर्षी कारखान्याने २ लाख ५० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले. जिल्हय़ात उसाची तूट असल्याने गळीत हंगाम लवकर गुंडाळावा लागेल, असेच सध्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा