दिवसेंदिवस औरंगाबाद जिल्ह्य़ातील पाणी व चाऱ्याची स्थिती गंभीर बनू लागली आहे. औरंगाबाद तालुक्यातील शिल्लेगाव, लासूर स्टेशन व अन्य ठिकाणी उभारण्यात आलेल्या जनावरांच्या छावण्यांमध्ये बागायतदार शेतकऱ्यांचीच जनावरे अधिक आहेत! शिल्लेगावच्या छावणीत केवळ ३ कोरडवाहू शेतकऱ्यांची जनावरे होती, तर बाकी ३२५ जनावरे बागायतदारांची आहेत. या अनुषंगाने बोलताना १६ एकरांचे मालक भीमराज चंदेल यांनी, ‘पाऊस आला नाही, विहिरी भरल्या नाही. आता आम्ही सारेच कोरडवाहू’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
भीमराज चंदेल व त्यांच्या भावाने १६ एकर शेतीमध्ये कापूस, मका, भुईमूग, अद्रक  ही वेगवेगळी पिके त्यांनी केली. मोसंबीचीही बाग होती. खरिपात उत्पादनात ४० टक्के घट झाली. मोसंबीची झाडे जळून गेली. चार विहिरी व दोन विंधन विहिरी असतानाही जनावरांना पाणी कोठून द्यायचे, हा प्रश्न होता. एक दुभती गाय, दोन वासरे, दोन बैल यांना पाणी आणायचे कोठून, म्हणून त्यांनी छावणीचा आसरा घेतला. खरे तर गंगापूर तालुक्यात ज्वारी निघाल्यानंतर बहुतेक शिवारात कडब्याची गंज उभी आहे. या महिनाअखेपर्यंत चारा टिकला असता. पण पाणी मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांनी छावण्या जवळ केल्या. पण खरी अडचण आहे, ती कोरडवाडू शेतकऱ्यांची.
वेणुबाई जयवंता नरवडे यांचा मुलगा टेलिफोन विभागात रोजंदारीवर काम करतो. एक एकरात काहीच पिकले नाही. त्यामुळे जनावरांचा चारा आणायचा कोठून आणि त्यासाठी पैसा कोठे, असा प्रश्न होता. त्यामुळे त्यांनीही दुभती गाय व वासरू छावणीत आणले. छावण्यांमुळे बागायतदार व कोरडवाहू हा भेदच जणू संपला. प्रत्येकाला पाण्याचीच समस्या असल्याने छावणीशिवाय पर्याय उरला नाही. छावण्या उघडण्यासाठी असलेली अनामत रक्कमेची अट शिथिल करण्याचा सरकारचा निर्णय बुधवारी निघाला. त्यामुळे आणखी काही ठिकाणी चारा छावणी सुरू होऊ शकेल.
चारा छावण्यांवर अपक्ष आमदार प्रशांत बंब यांचा झळकणारा चेहरा आणि छावणी व्यवस्थापनातील कार्यकर्ते ‘आमदारसाहेबांमुळे छावणी आली’ हे सांगायला विसरत नाही. शेतकऱ्यांना मात्र त्यातल्या राजकारणाशी काही देणे-घेणे नाही. एकवेळ चारा मिळाला नाही तरी चालेल, पण जनावरांना पोटभर पाणी मिळायला हवे, असे ते आवर्जून सांगतात. राजाराम गणपत जाधव यांच्याकडे तीन एकर शेती होती. ६ क्विंटल कापूस झाला. ज्वारीही झाली. पण घरी १३ दुभती जनावरे असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला. ते आता जनावरांसह छावणीत आश्रयाला आले आहेत. पण त्यामुळे त्यांचा आर्थिक फायदाही होऊ लागला आहे. जनावरांना वेळेवर पाणी व चारा मिळू लागल्याने दुधाच्या उत्पादनात वाढ झाली. छावण्यांमुळे बागायतदार व कोरडवाहू मात्र एकाच पातळीवर आले. दुष्काळग्रस्त गावातील हे चित्र पाण्याचे दुर्भिक्ष सांगण्यास पुरेसे ठरू शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा