उन्हाळा असो की पावसाळा, कायम टंचाईशी झुंजणाऱ्या मनमाडकरांच्या जीवनात यंदाच्या पावसाळ्यातही कोणताच फरक पडलेला नसून अजूनही १८ ते २० दिवसानंतर नळाव्दारे शहरात पाणी पुरवठा होत आहे.
मागील वर्षी वाघदर्डी धरण पूर्णपणे न भरल्याने जानेवारीपासूनच टंचाईची दाहकता जाणवू लागली होती. त्यातच पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी अद्याप समाधानकारक पाऊस नसल्यामुळे वाघदर्डी धरणातील पाणीसाठाही संपुष्टात आला. जून व जुलै महिन्यात नाशिक जिल्ह्य़ात पावसाळ्याच्या सुरूवातीला चांगला पाऊस झाल्याने पालखेड मधून पाणी सोडण्यासंदर्भात इतर कोणत्याही ठिकाणाहून मागणी आलेली नव्हती. फक्त मनमाड शहरातील पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेवून खास बाब म्हणून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. मध्यंतरीच्या तुरळक व मध्यम सरीमुळे शहरातील कुपनलिका व विहीरींना पाणी आल्याने टंचाईची तीव्रता काही अंशी कमी झाली. मात्र नळाने पुढील काळात पाणीपुरवठा होणे कठीण असल्याने पालखेडचे पाणी ३० जुलैऐवजी १८ जुलै रोजी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हे पाणी गुरूवारी सोडण्यात आले असून पाटोदामार्गे २१ जुलैपर्यंत हे पाणी वाघदर्डी धरणात येईल, अशी माहिती नगराध्यक्ष राजेंद्र पगारे यांनी दिली. पावसाळा सुरू होऊन जवळपास दीड महिना होत आला तरी मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झालेला नाही. पाटोदा साठवणूक तलावातीलही पाणीसाठा संपत आला आहे. त्यामुळे पालखेडमधून त्वरीत पाणी देण्याची मागणी पालिकेने केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा