समाज आणि राष्ट्रसेवा हे मी माझ्या जीवनाचे ध्येय ठरविले आणि त्याप्रमाणेच आजपर्यंत वाटचाल केली. समाज आणि राष्ट्रहिताचे काम करत असतानाच आपल्याला मरण यावे, अशी इच्छा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी गुरुवारी दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली.
षण्मुखानंद सभागृहात ‘मास्टर दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या दीनानाथ स्मृती पुरस्कार सोहळ्यात ‘जीवनगौरव’ पुरस्कार हजारे यांना प्रदान करण्यात आला.
लता मंगेशकर यांच्या हस्ते अण्णांना एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
याच वेळी पं. पंढरीनाथ कोल्हापुरे, उस्ताद झाकिर हुसेन, डॉ. आनंद यादव, शिवाजी साटम, ऋषी कपूर, ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, प्रकाश बाळ तसेच ‘छापा काटा’ या नाटकाच्या उत्कृष्ट निर्मितीसाठी मुक्ता बर्वे, दिनेश पेडणेकर आणि मीरज येथील ‘खरे वाचन मंदिर’ या संस्थेलाही लता मंगेशकर यांच्या हस्ते दीनानाथ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. चिमणराव लोकूर यांनी वाचन मंदिराच्यावतीने पुरस्कार स्वीकारला.
या पुरस्कारामुळे या वयातही काम करण्याची नवी प्रेरणा मला मिळाली आहे. प्रत्येक माणसाने आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे, त्याचे ध्येय ठरवावे आणि त्याप्रमाणे वाटचाल करावी, असे आवाहन अण्णा हजारे यांनी केले.
‘सीआयडी’मालिकेतील काही प्रमुख कलाकार, विश्व शांती केंद्राचे डॉ. विश्वनाथ कराड, रणबीर कपूर, नीतू सिंग, जुही चावला, श्रद्धा कपूर, कॅनरा बँकेचे मुख्य कार्यकारी संचालक व्ही. एस. कृष्णकुमार, शिवांगी, तेजस्विनी आणि पद्मिनी कोल्हापुरे या भगिनी यांचाही लता मंगेशकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हृदयनाथ मंगेशकर यांनी तर सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर उस्ताद झाकिर हुसेन यांच्या तबला वादनाचा कार्यक्रम झाला.
या वेळी वैजनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेल्या व लता मंगेशकर यांनी गायलेल्या ‘हाय रब्बा’ या आल्बमचेही प्रकाशन करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा