गडचिरोली जिल्ह्य़ामध्ये १६ सोनोग्राफी आणि १८ गर्भपात केंद्रे असून, या केंद्रांच्या तपासणी दरम्यान आलेल्या निरीक्षणानुसार दोन गर्भपात केंद्रांमध्ये दस्तऐवज सुव्यवस्थित न ठेवल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती जिल्हास्तरीय दक्षता पथकाच्या बैठकीत देण्यात आली.  
 सोनोग्राफी आणि गर्भपात केंद्रांची  जूनमध्ये संयुक्त पथकामार्फत धडक मोहीम अंतर्गत तपासणी करण्यात आली. तपासणी पथकात आरोग्य, महसूल आणि पोलीस या विभागांचा समावेश होता. तपासणीत १ हजार ८५९ एफ फार्म तपासले असता एक किंवा दोन मुली असलेल्या ३६० माता होत्या, अशीही माहिती बैठकीत देण्यात आली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी नीलेश गरणे यांनी दक्षता पथकातील सदस्यांनी जनतेत प्रसवपूर्व लिंग निदानासंबंधी जागृती करण्याकरिता प्रयत्न करावे आणि अनुचित प्रकार होणार नाही, यासाठी काळजी घ्यावी, अशा सूचना केल्या. बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आर.एस. फारुकी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.आर. चौधरी, जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र गोटा, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र ढोके, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त वि.ज. जावडेकर, अ‍ॅड. एच.आर. बांबोळे, प्रा. दिलीप बारसागडे, एस.डी. चिलमवार, अ‍ॅड. रश्मी उपस्थित होते.