‘संभवामि युगे युगे’ या महानाटय़ाच्या निमित्ताने येथील शिवाजी स्टेडियमवर गोकुळनगरी अवतरली आहे. गोवा-फोंडा येथील श्री विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने या महानाटय़ाचे प्रयोग २१ मेपर्यंत चालणार आहेत. पोलीस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण, संजय डी. पाटील, अरुण नरके, आनंदराव पाटील-चुयेकर, आनंद माने, मंडळाचे अध्यक्ष अरुण देसाई, जयंत देसाई, प्रफुल महाजन यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.     
शिवाजी स्टेडियमवर या नाटकासाठी भव्यदिव्य या नयनमनोहरी रंगमंचाची उभारणी केली आहे. फिरता, सरकता रंगमंच ही वैशिष्टय़े आहेत. नाटकामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. ३७० पात्र साकारणाऱ्या २०० कलाकारांनी या नाटकात सहभाग घेतला आहे. तसेच ६० स्त्री-पुरुष नर्तक कलाकारांनी या नाटकात आणखीनच रंगत आणली आहे. याशिवाय या नाटकात विविध प्रसंगांत हत्ती, घोडे, गाई-गुरे, रथ आदींचा वातावरणनिर्मितीसाठी वापर केला आहे. या नाटकात दहीहंडी, कालियामर्दन, रासलीला, पूतनावध, कंसवध, शिशुपालवध, रक्मिणी हरण, द्वारकानिर्माण, गीतोपदेश, कृष्ण-सुदामा भेट, द्रौपदी वस्त्रहरण असे घटनाप्रसंग परिणामकारकरीत्या सादर केले आहेत.    
युगपुरुष श्रीकृष्णाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत करमणुकीच्या माध्यमातून पोहोचविण्यासाठी या महानाटय़ाची निर्मिती केली असून, श्री विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळाचा बुधवारी सादर झालेला कोल्हापुरातील हा १०१वा नाटय़प्रयोग होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा