गुढीपाडव्यानिमित्त नववर्षांच्या स्वागताची शहरात सर्वत्र जय्यत तयारी करण्यात आली आहे. विविध संस्था-संघटनांनी या निमित्ताने सांस्कृतिक व समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यंदाच्या उत्सवाला दुष्काळाच्या गडद छायेची किनार असली, तरी पारंपरिक उत्साहाने सगळीकडे नववर्षांच्या स्वागताची तयारी सुरू आहे.
हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. खासदार चंद्रकांत खैरे यांची या वेळी उपस्थिती असेल. राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिर येथून दुपारी ३ वाजता शोभायात्रेला प्रारंभ होईल. शहागंज, गांधीपुतळा, सराफा रस्ता, सिटीचौक, गुलमंडी, औरंगपुरा मार्गे ही यात्रा खडकेश्वर येथील महादेव मंदिरात जाईल. शोभायात्रेत विविध धार्मिक संघटना सहभागी होणार असून, देखाव्यांसह पारंपरिक वेशभूषा केलेले संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. संध्याकाळी ६ वाजता महामंडलेश्वर दयानंदनमहाराज (सेलगाव) यांचे कीर्तन आयोजित केले आहे.
शहरातील अभिजित व सरला शिंदे हे दाम्पत्य गाजलेल्या नव्या-जुन्या गाण्यांचा कार्यक्रम ‘आलाप’तर्फे सादर करणार आहेत.
उद्या (गुरुवारी) रात्री साडेआठ वाजता संत एकनाथ रंगमंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. ‘आलाप’ वाद्यवृंदातर्फे गेली काही वर्षे शहरात गीत-संगीताच्या नजराण्याने कलाविष्कार सादर केला जातो. वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल देण्यासाठी जुन्या-नव्या मराठी व हिंदी गाणी कार्यक्रमात असणार आहेत. सरला शिंदे यांनी अनेक चित्रपटांसाठी पाश्र्वगायन केले आहे. प्रतिभावंत गीतकार, संगीतकार व गायकांनी अजरामर केलेली गाणी ‘आलाप’च्या माध्यमातून सादर केली जाणार आहेत. रसिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन शिंदे दाम्पत्याने केले आहे.

Story img Loader