राज्यातील पर्यटनस्थळांची माहिती देण्यासाठी नाशिक विमानतळावरील प्रवासी इमारतीत पर्यटन विकास महामंडळाने बसविलेली ‘इन्फॉर्मेशन अ‍ॅण्ड बुकिंग कियॉस्क’ ही यंत्रणा प्रत्यक्षात कार्यरत नसल्याचे उघड झाले आहे. विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात कुठलीच तोशीस राहू नये म्हणून संयोजकांनी बरीच धडपड केली. त्या अनुषंगाने विमानतळावर महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची माहिती देण्यासह ‘एमटीडीसी’च्या रिसोर्टची नोंदणी करण्याची व्यवस्था उपरोक्त यंत्रणेमार्फत करण्यात आली, परंतु विमानतळावर स्थानापन्न केलेली ही यंत्रणा प्रत्यक्षात शोभेची बाहुली ठरली आहे.  एचएएलच्या अखत्यारितील जानोरीलगतच्या जागेत सोमवारी नाशिक विमानतळाचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले. विमानतळावरील प्रवासी इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याच्या पाश्र्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली होती. विविध रंगसंगतीची फुले, पाने यांची आकर्षक  रोपेकुंडय़ांमधून मांडण्यात आली होती. इमारतीच्या सौंदर्यात कलाकृती, वारली छायाचित्रे आदींनी भर टाकली. राज्यातील पर्यटनस्थळांचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने या ठिकाणी खास अत्याधुनिक स्वरूपाची यंत्रणाही आणली आहे. विमानतळावर उतरणाऱ्या पर्यटकाला एका झटक्यात सर्व माहिती उपलब्ध होईल. शिवाय पर्यटन महामंडळाच्या रिसॉर्टस्ची आगाऊ नोंदणीची सुविधा ‘इन्फॉर्मेशन अ‍ॅण्ड बुकिंग कियॉक्स’ या यंत्रणेत आहे. उद्घाटनाच्या दिवशी प्रवासी इमारतीत असे दोन ‘कियॉस्क’ घाईघाईत स्थानापन्न करण्यात आले, मात्र ते प्रत्यक्षात कार्यरत नसल्याचे निदर्शनास आले. ‘टच स्क्रीन’ पद्धतीने चालणाऱ्या या कियॉस्कवर ‘टुरिझम साइट’, ‘रिसॉर्ट अव्हेलिबिलिटी’, ‘ट्रॅफिक चार्ट’ आणि ‘व्हिडीओ’ असे पर्याय दिसतात. कोणताही पर्याय निवडला तरी ही यंत्रणा पुढे सरकत नाही. कारण असे पर्याय निवडल्यास यंत्रणेच्या ‘स्क्रीन’वर ‘अनेबल टू कनेक्ट द इंटरनेट’ असा संदेश झळकू लागतो. नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवासी विमान सेवा अद्याप सुरू झालेली नाही. ही विमानसेवा कधी सुरू होईल याबाबतही अनिश्चितता आहे. त्यामुळे पर्यटन विकास महामंडळाच्या या ‘कियॉस्क’चा वापर कधी होईल हे सांगणे अवघड असले तरी उद्घाटनाच्या दिवशी ते निव्वळ शोभेची बाहुले ठरले होते. कारण उद्घाटन सोहळ्यास आलेल्या काही जणांनी उत्सुकतेने त्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. उद्घाटन सोहळ्यात मान्यवरांनी प्रवासी इमारत, त्यातील सोयी-सुविधा याविषयी भाषणात तोंडभरून कौतुक केले, परंतु ‘कियॉस्क’ यंत्रणेने वास्तव स्थितीवर प्रकाश टाकला. उद्घाटन सोहळ्याच्या पाश्र्वभूमीवर, घाईघाईत बसविलेल्या या यंत्रणेला इंटरनेटची जोडणी झाली नसल्याने ते कार्यरत होऊ शकले नसल्याचे लक्षात येते. या संदर्भात पर्यटन विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक प्रज्ञा बढे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही बाब मान्य केली. परंतु एकूण चार यंत्रणांपैकी केवळ दोन बंद, तर दोन कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. उद्घाटन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला कियॉस्कविषयी सांगण्यात आले. त्यामुळे ते घाईघाईत पुण्याहून मागविण्यात आले, अशी पुष्टीही बढे यांनी जोडली.

Story img Loader