चित्रपट हे मनोरंजनाबरोबरच प्रबोधनाचेही माध्यम आहे. यातला मनोरंजन हा एकमेव उद्देश आणि नफा हे एकमेव अर्थकारण लक्षात घेऊन इंडस्ट्रीतील मंडळी काम करत असतात. चित्रपटाचा विषय काहीही असो त्याच्या प्रचारासाठी, प्रसिध्दीसाठी सारी नैतिकता, सद्सद्विवेकबुध्दी या साऱ्या गोष्टी धाब्यावर बसवून वाटेल त्या गोष्टी अवलंबिल्या जातात. बालाजी प्रॉडक्शनची सर्वेसर्वा एकता कपूर हे नाव त्यात आघाडीवर आहे. एकता कपूर आणि वडील जितेंद्र यांचा देवांवर असलेला श्रध्दाभाव समस्त जनांना ज्ञात आहे. पण, ‘एक थी डायन’ या चित्रपटाच्या निमित्ताने त्याचा कळसाध्याय गाठला जातो आहे. डायन किंवा चेटकीण या विषयाभोवती चित्रपटाची कथा फिरत असल्याने एकता सध्या महाकुंभात आंघोळ करण्यापासून महायज्ञ करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी करणार आहे.
एरव्हीही एकता हातात नवग्रहांच्या अंगठय़ा, कपाळाला टिळा अशा वेषात वावरत असते. मात्र, गेल्या काही दिवसांत चित्रपटांसाठी म्हणून वाढत चाललेल्या आपल्या श्रध्देचा प्रसिध्दीसाठीही तिने जाणीवपूर्वक वापर सुरू केला आहे. त्याची सुरुवात म्हणून ‘रागिणी एमएमएस’ या चित्रपटाची वादग्रस्त नायिका सनी लिऑने हिला घेऊन एकताबाईंनी सिध्दिविनायकाला साकडे घातले. आता ‘एक थी डायन’ या चित्रपटासाठी एकताला महाकुंभ हे मोठे निमित्त मिळाले आहे.
चेटकीण ही संकल्पना आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे. पुराणातल्या गोष्टींमधून, लहान मुलांच्या कथांमधून दंतकथेच्या रू पात या चेटकिणीला आपण सामोरे गेलेलो असतोच. मात्र, आपल्याकडे उत्तरेकडील राज्यांमध्ये मुलींना, स्त्रियांना चेटकीण ठरवून तिला वाळीत टाकण्याची अनिष्ट प्रथा आजही जपली जाते आहे. एकताच्या ‘एक थी डायन’ या चित्रपटात या विषयावर चांगल्या अर्थाने काही प्रकाश पडणार आहे की नाही, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, या चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी एकता जे काही प्रकार करते आहे त्याला मात्र श्रध्दा असे गोड नाव देऊन दुर्लक्ष करता येणार नाही.
या चित्रपटाला वाईट शक्तींचा फटका बसू नये म्हणून एकतासाठी महाकुंभ मेळ्यात एका महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या महायज्ञात स्वामी चिदानंद सरस्वती आणि परमार्थ निकेतनचे अध्यक्ष ऋषिकेश सहभागी होणार आहेत. याशिवाय, अमावास्येच्या दिवशी एकताची टीम गंगेत स्नान करणार आहे. भरीस भर म्हणून अलाहाबादमध्ये संतमहात्म्यांना एकत्र करत खरोखरच चेटकीण हा प्रकार अस्तित्वात आहे की नाही, यावर ती परिसंवादही घडवून आणणार आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून चित्रपटाची प्रसिध्दी होईल पण चुकीच्या प्रथांनाही खतपाणी मिळेल, हा विचार एकता आणि तद्दन मंडळींच्या कधीतरी ध्यानात येईल का?

Story img Loader