मे. श्री सूर्या इन्व्हस्टमेंटचे ठगसेन दांपत्य समीर जोशी आणि पल्लवी जोशी यांच्या नावावरील संपत्ती गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याइतपत पुरेशी नसल्याची वस्तुस्थिती आर्थि गुन्हे शाखेच्या तपासातून समोर आल्याने गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर पडली आहे. चौकशीची दिशाच अद्याप निश्चित न झाल्याने गुंतवणूकदार संभ्रमात असून त्यांचे पैसे परत मिळण्याची आशा मावळत चालली आहे. जोशी दांपत्याने ५ हजार गुंतवणूकदारांची फसवणूक करून २५० कोटींचा घोटाळा केल्याचा प्राथमिक निष्कर्ष तपासात काढण्यात आला होता. प्रत्यक्षात श्री सूर्या इव्न्हस्टमेंटची संपत्ती फक्त ९ कोटी रुपयांची असल्याने गुंतवणूकदारांचे पैसे देण्याइतपत त्यांची आर्थिक परिस्थिती सुदृढ नाही.
समीर जोशी दांपत्याविरुद्ध तक्रार नोंदविण्याची हिंमत फक्त १७५ गुंतवणूकदारांनी दाखविली. या गुंतवणूकदारांनी मोठय़ा व्याजाच्या आमिषाला भुलून १ लाखपासून ते अधिक रकमेपर्यंतची गुंतवणूक कंपनीत केली होती. ही राशी १३ कोटींची असल्याचे सांगण्यात आले. समीर जोशीनेही त्याला ८० कोटी रुपये परत करायचे असल्याचे मान्य केले आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जोशी दांपत्याने एकूण किती गुंतवणूकदारांची फसवणूक केली यावर सध्या लक्ष केंद्रित केले आहे. जोशी दांपत्याला कुठलीही मोकळीक मिळू नये, यासाठी गुंतवणूकदारांना तक्रारी दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आतापर्यंतच्या चौकशीत श्री सूर्याची महाराष्ट्रात एकूण २५ ठिकाणी मालमत्ता असल्याचे आढळले आहे. याची एकूण किंमत ९ कोटी रुपये असून हा रक्कम गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्याएवढी सुद्धा नाही. यात जोशी दांपत्याने खरेदी केलेले फ्लॅट किंवा प्लॉट्सचा समावेश आहे. एवढय़ा घडामोडी घडत असतानाही समीर जोशी त्याच्याजवळ पुरेशी संपत्ती असल्याचा दावा करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  मिळालेल्या माहितीनुसार नागपुरात समीर जोशीचे २२ एकरात आलिशान फार्म हाऊस आणि व्यावसायिक संकुल आहे. अन्य संपत्ती त्याने दुसऱ्यांच्या नावे केली असल्याचा संशय आहे. एका राजकीय नेत्याच्या मध्यस्थीने समीर जोशीने नुकतीचा काही मालमत्ता विकून गुंतवणूकदारांच्या एका समूहाला पैसे दिल्याची माहिती असली तरी त्याला दुजोरा मिळालेला नाही. समीर जोशीने यापुढे परस्पर असे व्यवहार करू नयेत, यादृष्टीने आर्थिक गुन्हे शाखा खबरदारी घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
समीर जोशीच्या जाळ्यात फसलेल्या गुंतवणूकदारांच्या लढय़ासाठी सामाजिक कार्यकर्ते जम्मू आनंद यांनी पुढाकार घेतला असून अ‍ॅड. भगवान करडे यांनी अल्प शुल्कात गुंतवणूकदारांना कायदेशीर मदत देण्याची तयारी दर्शविली आहे. दोन दिवसांपूर्वी पीडित गुंतवणूकदारांची बैठक झाली. यात जोशी दांपत्याविरोधातील न्यायालयीन लढा अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा